समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांकडून घुसघोरी

Sep 14, 2024 - 10:21
Sep 14, 2024 - 15:23
 0
समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांकडून घुसघोरी

मालवण : सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत १२ वाव समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांकडून घुसखोरी करत म्हाकुल, बळा (रिबन फिश) यांसारख्या मासळीची बेसुमार लूट केली जात आहे, असा आरोप करीत स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष वेधले. मात्र, मत्स्य व्यवसाय विभाग सुशेगाद आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमार आक्रमक बनले आहेत. परिणामी नव्या मासेमारी हंगामातही समुद्रात संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

समुद्रातील वातावरणात बदल झाल्याने गणेशोत्सवापूर्वीच्या मासेमारी हंगामात मच्छीमारांना म्हणावी तशी मासळी मिळाली नाही. मात्र, आता समुद्रातील वातावरण निवळले असून मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत. यात गेले दोन दिवस जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बारा वावमध्ये परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांनी घुसखोरी करून माशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे. तोंडवळी येथील समुद्रातही दोन दिवस परप्रांतीयांकडून मासळीची लूट केली जात असल्याचे प्रकार दिसून आल्याने स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष वेधले. मात्र, मत्स्य व्यवसाय विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बारा वावपर्यंतचे जलधी क्षेत्र पारंपरिक मासेमारीसाठी राखीव आहे; मात्र, या क्षेत्रातही ट्रॉलिंगद्वारे मासेमारी केली जात आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. ट्रॉलिंगच्या घुसखोरीबाबतही मच्छिमारांनी आवाज उठवला आहे. कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय विभागाचे लक्ष वेधले असतानाही गेले चार दिवस मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही
कार्यवाही करण्यात आलेली नाही. सध्या समुद्रात म्हाकुल, बळा मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यातच मत्स्यव्यवसाय विभागाची गस्तीनौका कार्यान्वित नसल्याच्या संधीचा फायदा घेत परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांनी घुसखोरी करत मासळीची लूट करण्यास सुरुवात केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पारंपरिक मच्छीमार आक्रमक बनले आहेत. त्यामुळे नव्या मासेमारी हंगामातही संघर्ष घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गस्तीनौका आहे कुठे ?
हायस्पीड, पर्ससीन, एलईडीची मासेमारी रोखण्यासाठी जुलैच्या अखेरीस मत्स्य व्यवसाय विभागास अत्याधुनिक गस्तीनौका उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिले होते. मात्र, सप्टेंबर उजाडला तरी मत्स्य व्यवसाय विभागास गस्तीनौका उपलब्ध झालेली नाही. परिणामी परप्रांतीय ट्रॉलर्स धारकांनी घुसखोरी करून मासळीची लूट करण्यास सुरुवात केली आहे. शासन आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे, असा आरोप स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:48 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow