साहित्यिकाकडे नम्रता हवी, अहंकार नको! पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन

Sep 19, 2024 - 15:28
Sep 19, 2024 - 15:30
 0
साहित्यिकाकडे नम्रता हवी, अहंकार नको! पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन

खंडाळा: जयवंत दळवी हे मला मित्र म्हणून नव्हे, तर स्पर्धक म्हणून भेटले. मात्र स्पर्धा बाजूला राहिली आणि स्नेह वृद्धिंगत झाला.

साहित्यिकाकडे नम्रता असली पाहिजे, अहंकार नको, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा आणि बोरिवली शाखेच्या वतीने बोरीवली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार मनीषाताई चौधरी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नाटककार, अभिनेते अशोक समेळ होते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरीवली शाखेचे अध्यक्ष जगदीश भोवड यांनी केले. त्यानंतर बोलताना प्रा. ढवळ यांनी जयवंत दळवी यांच्या पहिल्या भेटीची अनोखी आठवण सांगितली. या शताब्दी वर्षात आणखी भव्य प्रमाणात कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला.

आपले मनोगत व्यक्त करताना नमिता कीर यांनी जयवंत दळवींच्या नाट्य आणि साहित्याची एकूणच संशोधनात्मक माहिती सादर केली. याप्रसंगी जयवंत दळवी यांचे चिरंजीव गिरीश दळवी यांनी अतिशय हळवी अशी बाबांविषयीची आठवण सांगितली.

ज्येष्ठ नाटककार अभिनेते अशोक समेळ यांनी दळवींच्या अनेक नाटकांविषयी साभिनय विवेचन केले. मधुभाई आणि दळवी आपली दैवते असल्याचे सांगितले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज वराडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये दळवींच्या कादंबऱ्यांतील बारकाव्यांचे वर्णन करताना त्यांच्या ओघवत्या शैलीचे वैशिष्ट्य सांगितले.

शेवटी मार्गदर्शन करताना मधुभाईंनी परममित्र दळवींच्या सोबत घालवलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषद हा एक परिवार असून त्या परिवाराने केशवसुतांचे स्मारक बांधल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच श्री.ना. पेंडसे यांना पालखीतून गारंबी येथे नेल्याची आठवण सांगितली.

बोरीवली शाखेच्या माजी अध्यक्षा अनुराधा नेरुरकर यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि दादर शाखेच्या अध्यक्ष विद्या प्रभू यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow