चिपळूण : धामणवणेतील कुंभार कुटुंबीयांचे पुन्हा उपोषण

Sep 21, 2024 - 10:28
 0
चिपळूण : धामणवणेतील कुंभार कुटुंबीयांचे पुन्हा उपोषण

चिपळूण : बिनशेती रस्त्यावर केलेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी धामणवणे ग्रामपंचायतीकडून कार्यवाही होत नाही. त्यामुळे संतापलेल्या कुंभार कुटुंबीयांनी स्थगित केलेले उपोषण पुन्हा छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २३ सप्टेंबरपासून चिपळूण पंचायत समितीच्या गेटसमोर सकाळी १० वाजल्यापासून उपोषण केले जाणार आहे. उपोषण करण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे.

धामणवणे येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासंदर्भात राणी कुंभार, मालसिंग कुंभार यांनी १५ ऑगस्ट २०२४ ला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. या वेळी सरपंच, ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्यासमोर हे अतिक्रमण ३० ऑगस्टच्या आत काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मुदत संपत आलेली असतानाही ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही न केल्याने मालसिंग कुंभार यांनी २८ ऑगस्टच्या आमसभेत प्रश्न उपस्थित करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या वेळी आमदार शेखर निकम यांनी गटविकास अधिकारी यांना ते अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात, असे आदेश दिले होते; मात्र त्यावरही काहीच कार्यवाही झाली नाही. अखेर कुंभार कुटुंबाने २ सप्टेंबरला स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू केले. या वेळी पुन्हा सरपंच यांनी धामणवणे पिटलेवाडी येथील बिनशेती रस्त्यावरील अतिक्रमण चार दिवसांत पोलिस बंदोबस्तात काढण्यासंदर्भात कुंभार कुटुंबाला लेखी पत्र दिले तसेच बीडीओ यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिल्याने प्रशासनाला सहकार्य करत त्या वेळीही कुंभार यांनी उपोषण स्थगित केले. दरम्यान, पंधरा दिवस झाले तरी याबाबत कार्यवाही न झाल्याने कुंभार कुटुंबीय २३ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow