बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही?; "घाईमध्ये राहून गेलं" : मुनगंटीवार

Jun 11, 2024 - 13:46
 0
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही?; "घाईमध्ये राहून गेलं" : मुनगंटीवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला देशभरातली मान्यवरांसह परदेशातील प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला या सोहळ्यासाठी निमंत्रित न केल्याने मनसे नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यावरुन आता भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन याची घोषणा केली. त्यानंतर राज्यभर मनसे नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रत्यक्षात राज ठाकरे यांनी मैदानात उतरत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतलेल्या उमेदवारांचा विजय देखील झाला. मात्र मनसेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याची खंत मनसे नेत्यांनी व्यक्त केली. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळाले असते तर आनंद झाला असता असं म्हटलं.

मनसेचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबले - प्रकाश महाजन

"मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले. त्यामुळे दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. मनसे पक्ष हा एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणं अपेक्षित नव्हतं. मात्र, एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन आमचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबत होते. निमंत्रण आलं असतं तर कुठं दिसले असते, मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपलेली आहे. गरज असल्यावर उंबरठे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं. याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहेत. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती. आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता," असे म्हणत प्रकाश महाजन यांनी आपली खंत व्यक्त केली होती.

घाईमध्ये निमंत्रण द्यायचे राहून गेलं - सुधीर मुनगंटीवार

या सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. ही गोष्ट मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. "या संदर्भात बाळा नांदगावकर म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलेलं नाही. हे निश्चितपणे मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार आहे. घाई गर्दीमध्ये विसरले असतील. यामध्ये दुसरे काही कारण वाटत नाही. कधी कधी घाईमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात तिथे कधी कधी आपले मित्र आहेत त्यांना निमंत्रण द्यायचे राहून जातं. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढ करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी घ्यायला हवी," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow