स्वाती मालिवालाही भाजपात!

नवी दिल्ली: दिल्लीसह पंजाबच्या राजकारणात आज खळबळ उडाली आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांनंतर, आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांसोबत आपण भाजपमध्ये विलीन होत असल्याची धक्कादायक घोषणा केली.

‘मूळ मूल्यांपासून पक्ष भरकटला’ – चड्ढा भावूक पत्रकार परिषदेत राघव चड्ढा भावूक झाले होते. आपल्या १५ वर्षांच्या प्रवासाचा संदर्भ देत ते म्हणाले, “ज्या आदर्शांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही आम आदमी पक्षाची स्थापना केली होती, त्यापासून पक्ष आता पूर्णपणे भरकटला आहे. मी पक्षापासून दूर जात असून जनतेच्या हितासाठी नवीन पाऊल उचलत आहे.”

राज्यसभेत ‘आप’चे विलीनीकरण: गणिते काय? राघव चड्ढा यांनी राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या एकूण १० खासदारांपैकी ८ खासदार (दोन-तृतीयांश पेक्षा जास्त) आपल्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. घटनेच्या तरतुदीनुसार, दोन-तृतीयांश बहुमत असल्यामुळे त्यांनी ‘विलीनीकरण’ (Merger) हा मार्ग निवडला आहे. यामुळे, पक्षांतरबंदी कायद्याचा (Anti-Defection Law) फटका न बसता हे खासदार आता भाजपसोबत आपले काम पुढे नेणार आहेत. यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आणि खासदारांच्या स्वाक्षऱ्या राज्यसभेच्या सभापतींकडे सोपवण्यात आल्या आहेत.

भाजपमध्ये सामील होणारे प्रमुख चेहरे: या मोठ्या राजकीय स्थित्यंतरात खालील ८ राज्यसभा खासदारांचा समावेश आहे: १. राघव चड्ढा (संस्थापक सदस्य) २. अशोक मित्तल: राज्यसभेतील उपनेते (पंजाब) ३. स्वाती मालीवाल: दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ४. संदीप पाठक: राष्ट्रीय संघटन सरचिटणीस ५. हरभजन सिंह: माजी क्रिकेटपटू (पंजाब) ६. बलबीर सिंह सीचेवाल: पर्यावरणवादी (पंजाब) ७. विक्रमजीत सिंह साहनी: प्रसिद्ध उद्योजक (पंजाब) ८. राजिंदर गुप्ता: (पंजाब)

राजकीय परिणाम: राघव चड्ढा यांची ही घोषणा आम आदमी पक्षासाठी एक मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ ठरू शकते. पंजाबमधील सत्तेत असताना आणि दिल्लीतही पक्षाची पकड असताना, इतक्या मोठ्या संख्येने खासदारांनी राजीनामा देणे हे पक्षाच्या नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. भाजपने या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या मोठ्या घडामोडीमुळे आगामी काळात अनेक समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 24-04-2026