चिपळूण:
मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवार रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी महामार्गावरील सिमेंटच्या दुभाजकाला (डिवायडर) जोरदार धडकल्याने हा अपघात घडला.
महेश अरुण गुडेकर (वय ५० वर्षे, रा. श्री समर्थनगर, सी-विंग, कापसाळ, डिगेवाडी, ता. चिपळूण) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.
नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महेश गुडेकर हे शनिवार, १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपली हँडीकॅप सुझुकी ॲक्सेस १२५ मोटारसायकल (क्र. MH-08-BB-7028) घेऊन रावतळे येथील रेडीज पेट्रोल पंप येथून कापसाळ येथील आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास ते मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना, कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला.
गाडी भरधाव वेगात असल्याने महेश गुडेकर हे गाडीसह रस्त्यावर बरेच अंतर घासपटत गेले आणि महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत चालकाविरुद्धच पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी मृत महेश गुडेकर यांचे भाऊ राजेंद्र अरुण गुडेकर (वय ५२ वर्षे, रा. काविळतळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत चालक महेश गुडेकर यांच्याविरुद्धच हयगयीने आणि भरधाव वेगात गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शनिवार रात्री १२ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 18-05-2026














