खेड: पर्यावरण पूरक आणि स्वच्छ शहर बनवण्याच्या दृष्टीने खेड नगर प्रशासनाने आता एक अत्यंत महत्त्वाचे आणि कडक पाऊल उचलले आहे. खेड शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्या व्यवसायिकांविरोधात नगर प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, शहरात धडक दंडात्मक कारवाई (Anti-Plastic Drive) सुरू करण्यात आली आहे.
खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या थेट नेतृत्वाखाली यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, गेल्या दोन दिवसांपासून मुख्य बाजारपेठेत कसून तपासणी मोहीम राबवली जात आहे.
‘या’ वस्तूंवर असणार पूर्णपणे बंदी!
शासकीय नियमांनुसार आणि पालिकेच्या आदेशानुसार बाजारात आढळणाऱ्या खालील वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे:
- १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या.
- प्लास्टिक व थर्माकोलपासून बनवलेले ताट, कप आणि ग्लास.
- प्लास्टिकचे चमचे, स्ट्रॉ (Straw) आणि सजावटीचे इतर साहित्य.
थेट दंडात्मक कारवाई; पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा…
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरणाऱ्या पथकांद्वारे बाजारपेठेतील दुकाने, फेरीवाले आणि व्यापाऱ्यांची अचानक तपासणी केली जात आहे. या मोहिमेत जर कोणी प्रतिबंधित प्लास्टिक बाळगताना किंवा त्याची विक्री करताना आढळल्यास पालिकेकडून खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येत आहे:
- पहिल्यांदा दोषी आढळल्यास: थेट ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास: संबंधित व्यावसायिकाला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या धडक कारवाईमुळे खेडमधील प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:33 22-05-2026














