Maharashtra Rain : महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या ९८% पाऊस पडणार! जेष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. साबळे यांचा दावा

Maharashtra Rain : देशात जरी सरासरीच्या ९० टक्के एवढाच पाऊस पडणार असला तरी राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार आहे. पावसाचे वितरण असमान राहणार असून पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे असा अंदाज जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

यासंदर्भातील पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.

राज्यात यंदा पाऊस कमी आहेच पण खूप कमी पाऊस आहे असं नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशात ९० टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. पण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल. दरम्यान, तरीही शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरणे, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणे आणि आंतरपीक पद्धतीचा वापर करणे या गोष्टीची आवश्यकता आहे.

जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात ९७ टक्के, मध्य विदर्भ व मराठवाड्यात १०० टक्के, पूर्व विदर्भात ९६ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९६ टक्के, पश्चिम महाराष्ट्रात ९७.६ टक्के आणि कोकणात सरासरी इतका पाऊस अपेक्षित आहे. पुणे, नागपूर, यवतमाळ, परभणी आणि दापोली येथे सरासरी एवढा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यासोबतच दापोली, अकोला, पुणे आणि यवतमाळ येथे लहान खंड, कराड, पाडेगाव व निफाड येथे मध्यम खंड, तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी आणि नागपूर भागात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. काही भागांत आवर्षणसदृश परिस्थितीही निर्माण होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, मटकी, चवळी, बाजरी आणि ज्वारी या पिकांची निवड करावी त्याचबरोबर बाजरी-तूर, तूर-भुईमूग, कापूस-मूग अशा आंतरपीकांची लागवड करावी. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत पुरेशी ओल असेल तरच पेरणी करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:43 02-06-2026