Abhijeet Dipke: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन; अभिजीत दीपके भारतात परतणार

◼️ ६ जून रोजी जंतर-मंतर मैदानावर ठिय्या; नीट पेपरफुटी आणि सीबीएसई कारभाराविरोधात एल्गार

दिल्ली: Abhijeet Dipke News: देशभरात सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’ (CBSE) परीक्षांमधील कथित ढिसाळ कारभारावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरील बहुचर्चित ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी ६ जून रोजी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर भव्य आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे थेट अमेरिकेतून भारतात येत आहेत.

सरन्यायाधीशांच्या विधानावरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना

सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सरन्यायाधीशांनी एका खटल्यादरम्यान केलेल्या विधानाचा संदर्भ घेत अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या डिजिटल मोहिमेची तसेच पक्षाची स्थापना केली होती. अल्पावधीतच या कल्पनेला आणि पक्षाला सोशल मीडिया युजर्सकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देशातील शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या कथित गैरकारभाराबद्दल आणि पेपरफुटी प्रकरणांवरून या माध्यमातून थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या धोरणांना लक्ष्य केले जात आहे.

‘माझं नशीब देशाच्या संविधानाच्या हातात’ – अभिजीत दीपके

सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अभिजीत दीपके यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत आपण भारतात परतत असल्याची माहिती दिली. “मी माझे नशीब भारताच्या संविधानाच्या हातात सोडत आहे,” असे भावूक आणि महत्त्वपूर्ण विधान त्यांनी या पोस्टमध्ये केले आहे. अमेरिकेतून सुरू झालेल्या या डिजिटल चळवळीला आता प्रत्यक्षात रस्त्यावरील आंदोलनाचे रूप आले असून, भारतातील तरुणांकडून या मोहिमेला मोठे समर्थन मिळत आहे.

शांततापूर्ण मार्गाने जंतर-मंतरवर होणार निदर्शने

शनिवारी, म्हणजेच ६ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. “आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी संविधानाच्या मार्गाने एकत्र यायला हवे. शांततापूर्ण मार्गाने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी. आपण सर्वांनी आवाज उठवला, तर सरकारला आपले म्हणणे नक्कीच ऐकावे लागेल,” असे आवाहन दीपके यांनी देशवासीयांना केले आहे. या आंदोलनाला केवळ विद्यार्थीच नव्हे, तर देशातील काही नामांकित सामाजिक कार्यकर्ते आणि कला क्षेत्रातील दिग्गजांनीही आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या पूर्वतयारीचे विविध व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. त्यामुळे या ६ जूनच्या आंदोलनाकडे आणि अमेरिकेतून भारतात येणाऱ्या अभिजीत दीपके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 05-06-2026