नवी दिल्ली: ‘CJP Protest Delhi’ म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीने (CJP) केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर मोठे आंदोलन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी फॉलोअर्स जोडणाऱ्या या पक्षाने पहिल्यांदाच थेट रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले. अमेरिकेतून थेट राजधानी दिल्लीत दाखल झालेले ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले, ज्यामध्ये शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत देशातील तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
विमानतळावरून बाहेर पडतानाच अभिजीत दीपके यांनी हातामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र घेऊन थेट आंदोलनात सहभाग घेतला. विमानतळ परिसर आणि जंतरमंतर येथे त्यांच्या स्वागतासाठी तरुणांची मोठी गर्दी उसळली होती. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी हे तरुण दिल्लीत एकत्र आले होते. या आंदोलनाचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले असून, राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील भाषणे आणि घोषणाबाजीचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, ही देशातील युवांची अभिव्यक्ती नसून, अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेचे ते दर्शन आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हातात घ्यायचे आणि दुसरीकडे त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्था व व्यवस्था उखाडून टाकण्याची भाषा करायची, हा दुटप्पीपणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधान हे केवळ एक पुस्तक नसून त्यातील प्रत्येक कलमामध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्त्वे सामावलेली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले. ही लोकशाही तत्त्वे नाकारणारे लोक हातात पुस्तक घेऊन फिरले, तरी ते प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान विरोधीच आहेत. आजच्या या आंदोलनाने त्यांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि मनसुबे जनतेसमोर उघडे पाडले असून, या आंदोलनाला सर्वसामान्य जनतेचे कोणतेही समर्थन मिळालेले नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही या घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आजचा भारतीय तरुण हा इनोव्हेशन (नवनिर्मिती) आणि क्रिएशनसाठी ओळखला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही घटक देशातील तरुणाईला ‘अँटी इस्टॅब्लिशमेंट’ (व्यवस्था विरोधी) असे नाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, देशातील तरुण स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि पूर्ण अनुशासनाने राष्ट्र निर्मितीसाठी काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे दिल्लीत या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे अभिजीत दीपके यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या मूळ गावी चिंता व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतील आंदोलन संपवून अभिजीत दीपके हे आता वाळूज येथील आपल्या आई-वडिलांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:01 08-06-2026














