◼️ बळीराजा सुखावला; विजांच्या कडकडाटासह ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज
महाराष्ट्र मान्सून अपडेट्स संदर्भात भारतीय हवामान विभागाने (IMD) आज संपूर्ण राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांमध्ये आज (१० जून) पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान बदलामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि विशेषतः कोकण किनारपट्टीसह विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता अधिक आहे. याशिवाय मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचाही या यलो अलर्टमध्ये समावेश आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि उपनगरांतील अनेक भागांत हलक्या सरींचा शिडकावा झाला असून, आज प्रामुख्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
आंबोली घाटात पर्यटकांची गर्दी; पहिल्या पावसाने धबधबे झाले प्रवाहित
मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या पहिल्या पावसाच्या आगमनाने दक्षिण कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीतील निसर्गाचे रूप पूर्णपणे पालटले आहे. दाट धुक्याची चादर, ऊन-पावसाचा खेळ आणि आल्हाददायक वातावरणामुळे आंबोलीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पहिल्याच जोरदार पावसामुळे आंबोली घाटातील मुख्य धबधबा आता काही अंशी प्रवाहित झाला असून, काळ्याशार कड्यावरून पाण्याचे पांढरेशुभ्र प्रवाह हळूवारपणे खाली कोसळू लागले आहेत. निसर्गाचे हे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक आंबोली घाटात दाखल होत आहेत.
बीड तालुक्यात नदी-नाले प्रवाहित, तर गडचिरोलीत २९ तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत
दुसरीकडे, मराठवाड्यातील बीड तालुक्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसामुळे छोटे नदी आणि नाले प्रवाहित झाले आहेत. तालुक्यातील चौसाळा, रौळसगाव, अंजनवती, लिंबागणेश आणि मांजरसुंबा परिसरात झालेल्या या पावसाने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे अंजनवती गावात काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने एक कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना जमीन चांगली ओली होईपर्यंत म्हणजेच किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या घाईघाईने करू नयेत, असे आवाहन केले आहे.
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिरोंचा शहरासह तालुक्यातील ५० हून अधिक गावांना तब्बल २९ तास अंधाराचा सामना करावा लागल्यानंतर अखेर आज वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. आलापल्ली ते सिरोंचा दरम्यानच्या ९० किलोमीटर लांबीच्या ६६ केव्ही वीजवाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. घनदाट जंगलात जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत हा पुरवठा सुरळीत केला असला, तरी या भागातील वीज व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी जिमलगट्टा येथे स्वतंत्र तांत्रिक पथक द्यावे आणि तेलंगणातून प्रस्तावित १३२ केव्ही वीज प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 10-06-2026














