Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात १९ जूनपर्यंत पावसाचे अलर्ट क्षीण; उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांमुळे ‘मान्सून’ रखडला..

पुणे:

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्र आणि गोवा वगळता देशातील १५ राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार मुसंडी मारली असली, तरी महाराष्ट्रात मात्र मान्सूनची प्रगती सध्या पूर्णपणे खोळंबली आहे. राज्यातील बारामती-सोलापूर आणि कोकणातील हरणाई भागात मान्सूनचे वारे अडकून पडले असून, १९ जूनपर्यंत पावसाचे अलर्ट अत्यंत क्षीण झाले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे बाष्प शोषले जात असल्याने महाराष्ट्रात मान्सून बरसण्यात अडचण येत असून राज्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांचा प्रभाव सध्या तीव्र आहे. हे कोरडे व उष्ण वारे हवेतील बाष्प शोषून घेत आहेत, ज्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्यक असणारे अनुकूल वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकलेले नाही. परिणामी, मान्सून एकाच ठिकाणी रेंगाळला असून अनेक भागांत पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा असताना, देशातील इतर १५ राज्यांमध्ये मात्र मान्सूनने १६ जूनपर्यंत अतिशय चांगली प्रगती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश असून तेथे सध्या मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे.

मान्सून रेंगाळल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा वाढला असून उकाडा असह्य झाला आहे. मंगळवारी नोंदवलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मालेगाव येथे सर्वाधिक ४०.६ अंश सेल्सिअस, तर गोंदियामध्ये ४०.४ आणि जळगावमध्ये ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील मंगळवारचे तापमान खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहे:

  • कोकण व मुंबई परिसर: रत्नागिरी ३५ अंश, मुंबई ३५ अंश सेल्सिअस.
  • पश्चिम महाराष्ट्र: पुणे ३५.९ अंश, लोहेगाव ३५.४ अंश, कोल्हापूर ३४.५ अंश, सांगली ३५.५ अंश, सातारा ३५.८ अंश, सोलापूर ३८.८ अंश आणि महाबळेश्वर २६.१ अंश सेल्सिअस.
  • विदर्भ व मराठवाडा: चंद्रपूर ३८.२ अंश, नागपूर ३८.६ अंश, वाशिम ३८.८ अंश, यवतमाळ ३९.४ अंश, अहिल्यानगर ३७.१ अंश, नाशिक ३४.७ अंश, धाराशिव ३७.३ अंश आणि बीड ३९.६ अंश सेल्सिअस.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 17-06-2026