कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बाेगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. परंतु, बोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा कोणत्या तरी कारणास्तव हा बोगदा नेहमीच बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहनचालकांना कशेडी घाट पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो.
सद्यस्थितीत बाेगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे बोगद्यातून हाेणारी वाहतूक सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्यस्थितीत घाट रस्त्याची गेले अनेक वर्षे डागडुजी न केल्याने घाट रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटारेही नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे या घाट रस्त्याने वाहतूक करणे हे धोकादायक बनले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 25-11-2024

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!