गुहागरातील १९० प्राथमिक शाळांना नाही क्रीडांगण

गुहागर : शालेय अभ्यासक्रमात तसेच क्रीडा स्पर्धातही गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळा सातत्याने जिल्हास्तरावर अव्वल क्रमांक पटकावित असतात. तालुक्यातील २०५ प्राथमिक शाळापैकी १९० प्राथमिक शाळांच्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणच उपलब्ध नाही, ही वास्तव परिस्थिती आहे. शाळांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचा मोसम आता सुरू होणार असून त्यानिमित्ताने ही बाब अधोरेखित झाली आहे.

गुहागर तालुका शिक्षण विभागाच्या २०५ प्राथमिक शाळा व २० केंद्रशाळा आहेत. गेल्यावर्षी शिक्षण विभागाने शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय अहवाल जि. प.ला पाठविला होता. त्यानंतर तो पुढे शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. यामध्ये गुहागरमधील १९० प्राथमिक शाळांना क्रिडांगण नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. क्रिडा शिक्षण प्राथमिक शाळांना अनिवार्य असल्याकारणाने शाळांचे शिक्षक व गावातील प्रमुख नागरिक मुलांच्या खेळाची सोय अन्य मोकळ्या जागी किंवा शेतामध्ये करतात.

अशा ठिकाणी शाळांचे क्रीडा शिक्षक मैदान तयार करून मुलांचा सराव करतात. ही मैदाने तात्पुरती तयार केली असल्याकारणाने त्याचा वापरही काही दिवसांपुरता मर्यादित असतो. त्यामुळे शाळेमध्ये शासनाकडून उपलब्ध केलेले क्रीडा साहित्य मुलांना वापरता येत नाही. क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी योग्य सराव होत नाही. त्यामुळे शाळांसाठी क्रीडांगणच नसल्याने विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्याचा विकास होणार कसा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 05/Dec/2024

tata motars