रत्‍नागिरी : ‘वंचित’च्या मोर्चास परवानगी नाकारली

चिपळूण : वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर नरवण (ता. गुहागर) येथील झालेल्या हल्ल्याच्या विरोधात दि. 12 रोजी वंचितच्या वतीने विराट मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र, या मोर्चाच्या आयोजनास उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, अण्णा जाधव यांनी शिष्टमंडळासह उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांची भेट घेऊन चर्चा केली. नरवण येथे दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात ते जखमी झाले. या हल्ल्याच्या विरोधात विराट मोर्चाच्या आयोजनास परवानगी देण्यात आली. परंतु जिल्हाधिकारी यांनी दि. 6 ते 20 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

याचबरोबर गुहागर तालुक्यातील नरवण येथील हल्ल्यासंदर्भात सद्यस्थितीत दोन आरोपींना दि. 9 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. मोर्चाच्या आयोजनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. असे असताना अर्जदार जाधव यांना अशा परिस्थितीत विराट मोर्चाच्या आयोजनास परवानगी देणे उचित नाही, असा फेर अभिप्राय पोलिसांनी या कार्यालयाकडे सादर केला असल्याने मोर्चास दिलेली परवानगी याद्वारे रद्द करून उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी फेरआदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 12-12-2024

Rotery school