Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, हवामानात होणाऱ्या या बदलांचा आता थेट परिणाम ऋतूचक्रावरही होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बहुतांश भागात उन्हाच्या झळ्या बसत आहेत.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तरेकडे पश्चिमी विक्षोभ सक्रिय असल्यामुळे पुन्हा एकदा तापमानात घट झाली असून, काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य भारतामध्ये कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, दक्षिण भारतातही हेच चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यात सध्या दिवसा उन्हाच्या झळ्या बसत आहेत. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, किमान आणि कमाल तापमानामध्ये बराच फरकही पाहायला मिळत आहे. राज्याच्या विदर्भातील नागपूरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरात क्षेत्रामध्ये उष्णता दर दिवसागणिक वाढत आहे.
प्राथमिक माहितीनुसार सध्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये करण्यात आली असून, इथं पारा ३८ अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. काही भागांमध्ये दिवसा घाम फोडणारा उकाडा असतानाच रात्री आणि पहाटेच्या समयी मात्र हवेत गारठाही जाणवत आहे. मुंबईसुद्धा या उष्म्याला अपवाद नाही. शहरात सध्या तापमानाचा आकडा ३६ अंशांवर असला तरीही त्याचा दाह मात्र ३८ अंश सेल्सिअस इतका जाणवू लागला आहे.
राज्यातील सागरी किनारपट्टी भागात दमट वातावरणात वाढ झाली आहे. समुद्राच्या पृष्ठावरून वाहणारे उष्ण वारे आता उन्हाळा आणखी तीव्र होणार याचीच जाणीव करून देत आहेत. परिणामी मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी आणि बहुतांश कोकणालाही उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण येत्या २४ तासांमध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे आठवड्याच्या शेवट उकाड्यानेच होणार असून, ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी उष्मा आणखी जाणवू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर ८० ते ८५ दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे.
* गहू पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १०% ईसी १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५% ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील कमाल तापमान अंश सेल्सिअस
सोलापूर | ३८ अंश सेल्सिअस |
नागपूर | ३७ अंश सेल्सिअस |
अकोला | ३६.८ अंश सेल्सिअस |
चंद्रपूर | ३६.८ अंश सेल्सिअस |
सांताक्रूझ | ३५ अंश सेल्सिअस |
रत्नागिरी | ३४.३ अंश सेल्सिअस |
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 21-02-2025
