Maharashtra Weather : परतीचा पाऊस अजून किती दिवस..?

मुंबई : राज्यातून परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसून, १५ ऑक्टोबरपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक विभागाने दिली आहे.

यामुळे आता राज्यात जो पाऊस होत आहे, त्याला परतीचा पाऊस म्हणता येणार नाही, असे या विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या दिवसात विदर्भासह राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या परतीचा पाऊस हा देशातील पंजाब, हरयाणा, हिमालय, कच्छ, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातमध्ये परतला असून, महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याला स्पर्शन गेला आहे.

राज्यातील परतीच्या पावसाचे चित्र १५ ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. येत्या तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतून म्हणजेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

परतीचा पाऊस खान्देशातील नंदुरबार जिल्ह्याला स्पर्शन गेला आहे. येत्या तीन दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. – प्रवीणकुमार, हवामानशास्त्रज्ञ, नागपूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 11-10-2024