Breaking : विधानपरिषदेसाठी भाजपकडून यादी जाहीर

Jul 1, 2024 - 15:00
Jul 1, 2024 - 15:01
 0
Breaking : विधानपरिषदेसाठी भाजपकडून यादी जाहीर

मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.

त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?

पंकजा मुंडे

योगेश टिळेकर

परिणय फुके

अमित गोरखे

सदाभाऊ खोत

लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे.

पंकजा मुंडे यांना संधी

बीडमधून पराभवाचा धक्का बसल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जात होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना विधानसपरिषदेवर संधी देण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाकडे 11 नावांची यादी पाठवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणूक आणि राजकीय समीकरणे लक्ष घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेला वंजारी समाज दुखावला गेला होता. गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधानपरिषेदची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

पंकजा मुंडे कायद्याच्या सभागृहात असायला हव्या, दान नको, तो आमचा हक्क : लक्ष्मण हाके

ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळायला हवी, असे वक्तव्य केले होते. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत. मात्र त्यासाठी आम्हाला कोणीही दान म्हणून ते करू नका, भूतदया दाखवू नका, तो आमचा हक्क आहे. इथल्या तरुणांच्या त्या भावना आहेत. आमचा ओबीसी जसा-जसा बाहेर येईल, एकत्र येईल, तसा- तसा महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सर्व गोष्टींचा प्रभाव पडेल, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow