लांजा : कोंडगे धनगरवाडी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी

Jun 28, 2024 - 11:29
 0
लांजा : कोंडगे धनगरवाडी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी

लांजा : तालुक्यातील कोंडगे धनगरवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पंधरा वर्षांनी सुटला आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात धावणारा टँकर कायमस्वरूपी थांबणार आहे. गेली १५ वर्षे लांजा तालुक्यातील कोंडगे धनगरवाडीला टंचाई जाणवत होती. डॉ. एस. व्ही. कदम हे सरपंचपदी निवडून आल्यानंतर त्यांनी प्राधान्याने धनगरवाडीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली.

धनगरवाडी ही मुख्य रस्त्यापासून ४ किलोमीटर अंतरावर उंच ठिकाणी आहे. त्यांच्या वस्तीत गाड्या जाण्यासाठी रस्ता आणि पाण्यासाठी विहीर नव्हती नळपाणी योजना नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. जवळच असलेल्या झऱ्याचे पाणीही पिण्यायोग्य नव्हते. मार्च महिन्यापासून येथे भीषण टंचाईला सामोरे जावे लागत होते. या कालावधीत गेली १५ वर्षे टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. टँकरची गाडी साधा मातीचा रस्ता असल्यामुळे चढावातून गावापर्यंत नेताना अनेक अडचणी येत होत्या. शेवटी टँकरचे निम्मे पाणी वाया जात होते. सरपंच कदम यांनी ग्रामपंचायत निधीतून गावाजवळ असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ठिकाणी खड्डा खोदला आहे. त्याच्या सभोवार काळ्या दगडाने संरक्षण कठडाही बांधून घेतला. त्यासाठी ३ मीटर दगड फोडण्यात आला, त्यामुळे धनगरवाडी टँकरमुक्त होणार आहे. या कामाची पाहणी उपअभियंता करंडे, अगाव, सुहास कदम यांनी केली. पंधरा वर्षांनंतर कोंडगे गावातील धनगर समाज टँकरमुक्त झाल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सरपंच कदम यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

झऱ्याच्या ठिकाणी खोदला खड्डा
कोंडगे धनगरवाडी गावाजवळ एक पाण्याचा झरा आहे. या झऱ्याच्या ठिकाणी कदम यांनी ग्रामपंचायत निधीतून खड्डा खोदला. त्याठिकाणी काळ्या दगडाने संरक्षण कठडाही बांधून घेतला. त्यामुळे आता उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow