खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाचा आज रत्नागिरीत शुभारंभ

Jul 10, 2024 - 09:53
Jul 10, 2024 - 09:56
 0
खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाचा आज रत्नागिरीत शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार व कोकणचे नेते नारायण राणे हे बुधवार १० जुलै रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, रत्नागिरीत खासदार संपर्क कार्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांचा भाजपाच्या वतीने सकाळी ११ वा. स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात जाहीर सत्कार केला जाणार असल्याची माहिती भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दादा दळी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके व युवा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले की, खासदार नारायण राणे हे विजयानंतर प्रथमच रत्नागिरी तालुक्याच्या भेटीवर येत आहेत. रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे अपना बाजार शेजारी त्यांच्या हस्ते खासदार संपर्क कार्यालयाचा शुभारंभ १०.३० वा. होणार आहे. यावेळी खा. राणे यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे हेही उपस्थित राहणार आहेत. यानंतर खा. राणे यांचा स्वा. सावरकर नाट्यगृहात भाजपाच्या वतीने जाहीर सत्कार केला जाणार आहे.

खा. राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना चालना मिळणार आहे. खा. राणे यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून आपण गडनदी प्रकल्पग्रस्तांच्या पाणी प्रश्नाची माहिती दिली होती. अनेक वर्ष नदीच्या दोन्ही बाजूने कालवे असूनही शेतकरी व ग्रामस्थांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे मातीच्या कालव्या ऐवजी एचडीपी पाईप बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर खा. राणे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने एचडीपी पाईपचे अंदाजपत्रक करण्याची सूचना चिपळूण विभागाला केली आहे. त्यामुळे खा. राणे यांच्यामुळेच हा विषय मार्गी लागणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजनमध्ये खा. राणे प्रथमच सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकत्यांना विकासकामांसाठी आवश्यक निधी निश्चित उपलब्ध होईल. पावसाळ्यात धबधबे, काही पर्यटनस्थळे बंद करण्यात येतात ती पर्यटनस्थळे बंद न करता तेथे आवश्यक त्या उपाययोजना करून सुरक्षित असलेली पर्यटनस्थळे निर्माण करण्याची मागणी खा. राणे यांच्याकडे केली आहे तर केंद्र शासनाच्या सर्व योजना, पर्यटन, मत्स्य, आरोग्य या विषयात खा. राणे यांनी लक्ष टाकावे, अशी विनंती आपण केली आहे. लवकरच सर्व विभागांच्या आढावा बैठका खा. राणे घेणार असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले.

४५ वर्षांतील जिल्हाध्यक्षांचा सत्कार...
रत्नागिरी मतदारसंघात ४५ वर्षांनंतर भाजपाचे कमळ चिन्ह फुलले आहे. १९८० पासून आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. त्यामुळे मागील ४५ वर्षांतील जिल्हाध्यक्षांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार केला जाणार आहे. यावेळी खा. राणे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow