'लाडकी बहीण योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती

Jul 13, 2024 - 17:09
 0
'लाडकी बहीण योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी व सुलभतेने अंमलबजावणी होण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शुक्रवारी नवा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

गावपातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचा या ग्रामस्तरीय समितीमध्ये समावेश असेल. समितीने योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करावी. ऑफलाइन अर्ज यथावकाश ॲप/पोर्टलवर भरण्यात यावेत. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे.

याशिवाय या आदेशात म्हटले आहे की, परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. महिलेच्या पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्डदेखील ग्राह्य धरण्यात यावे, असे नव्या आदेशात म्हटले आहे.

सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे की, योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पुढीलप्रमाणे राहील. कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow