कोकण बोर्ड अध्यक्षाविनाच..!

May 29, 2024 - 16:35
May 29, 2024 - 16:49
 0
कोकण बोर्ड अध्यक्षाविनाच..!

◼️  कोकण बोर्डामध्ये अध्यक्षांसह सचिव, सहसचिव, सहा. सचिव पदे रिक्त

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेत कोकण बोर्डाने नेहमीप्रमाणे सलग १३ वर्षे राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला बोर्डामधील महत्वाची अधिकाऱ्यांची पदे अद्याप रिक्त आहेत. सगळी मदार ही प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे एकूण ९ विभाग आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी कोकण बोर्ड आहे. या कोकण बोर्डाची स्थापना १३ वर्षांपूर्वी करण्यात आली. या कोकण बोर्डाचे कार्यालय रत्नागिरी येथे असून या ठिकाणाहून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा कारभार चालतो. अगदी सुरुवातीपासूनच कोकण बोर्डाने राज्यात आपला दबदबा कायम ठेवत सलग १३ वर्षे १० वी तसेच १२ वी परीक्षेत अव्वल ठरत आहे. बोर्ड अव्वल ठरत असले तरी गेल्या काही वर्षांपासून बोर्डाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मुळात अधिकारीच नसल्याने बोर्डाचा कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहा. सचिव ही महत्त्वाची पदेच रिक्त आहेत. बोर्ड अध्यक्षविनाच गेली काही वर्षे चालत आहे. सध्या प्रभारी अध्यक्ष म्हणून चोथे हे काम पाहत आहेत. तर सचिव पद हे माध्य. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे आहे. बोर्डात सचिव हे पद महत्त्वाचे आहे. मात्र, ते प्रभारींच्या हातात आहे. असे असले तरी सुवर्णा सावंत यांनी योग्य नियोजन करत प्रशासकीय कामकाजात राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याबाबत शासनाकडूनसुद्धा त्यांचे वारंवार कौतुक झाले आहे. यावर्षी राज्यात प्रथम वेळेच्या आधी कोकण बोर्डाचाच निकाल सादर करण्यात आला.

मुलांपेक्षा मुलींचीच बाजी...
जिल्ह्यातील मुला-मुलींची आकडेवारी बघता १३ हजार ७३५ मुलांपैकी १३ हजार ५५१ मुले उत्तीर्ण होत ९८.६६ टक्के तर १३ हजार ४५ मुलींपैकी १२ हजार ९६६ मुली उत्तीर्ण होत ९९.३९ टक्के निकाल लागला आहे. तुलनात्मक स्थिती बघता मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.७३ टक्के अधिक आहे.

बोर्डाच्या इतिहासात प्रथमच मे मध्ये निकाल
महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे स्थापन झाल्यापासून १० वी चा निकाल हा प्रथमच मे महिन्यात लागला आहे. यापूर्वी हा निकाल जून महिन्यात लागत होता. यावर्षी पहिल्यांदाच लवकर निकाल लागल्याने विद्यार्थ्यांनासुद्धा पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी सोयीचे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:04 PM 29/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow