खेड : निसर्ग सौंदर्याने नटला रघुवीर घाट..!

Jul 1, 2024 - 15:00
Jul 1, 2024 - 15:33
 0
खेड : निसर्ग सौंदर्याने नटला रघुवीर घाट..!

खेड : निरव शांतता, सह्याद्रीच्या अभेद्य कडेकपारीतून फेसाळणाऱ्या जलप्रपातांचा आवाज, थंड वातावरण, सोबतीला मुसळधार पाऊस अन दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने हिरवा शालू पांघरला आहे. निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी जणू सादच घालत असून पावसामुळे या घाटात निसगनि मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी व चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावले रघुवीर घाटाकडे वळू लागली आहेत.

गावे सातारा जिल्ह्यात
कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट, चकदेव, बन, निवळी, वाघावळे, म्हाळुंगे, सालोशी, कांदाट, अकल्पे, मोरणी आदी १४ गावे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात जोडली असली तरी रघुवीर घाटच दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे हा घाट पावसाळ्यात निसर्गाचे वेगळेच लेणं घेऊन पर्यटकांच्या स्वागतासाठी उभाच असतो.

तालुक्यापासून खोपी येथे सुमारे ३२ किमी अंतरावर असलेला रघुवीर घाट पावसाळयातील पर्यटकांचे एक नवे "डेस्टिनेशन" ठरत आहे. शिंदी व सातारा या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट म्हणजे दळणवळणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ७६० मीटर उंच, तर लांबी १४ किमी आहे.

या घाटात पावसाल्यात तर जणू स्वर्गच उतरल्याचा अनुभव अनेकांना येतो. दाट धुक्यांमुळे डोंगर माथ्यावर उतरलेले ढग, कड्याकपारीतून वाहणारे लहान मोठे धबधबे हे पर्यटकांना जणू काही आव्हानच देत असतात. एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगामध्ये फेसाळत कोसळणारे २७ हून अधिक धबधब्यांबरोबरच दाट धुके अन् नीरव शांततेची पर्यटकांवर मोहिनीच पडते. त्यामुळे या घाटाचे "गारुड" आजही पर्यटकांच्या मना मनावर कायम आहे.

दरडींचा धोका कायम
मुसळधार पावसामुळे कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. धबधबेही प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावले आता घाटाकडे वळू लागली आहेत. असे जरी असले तरी घाटात दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow