रत्नागिरी : स्टरलाईटच्या ५३० एकरपैकी पाच एकर जागेवर घनकचरा प्रकल्प - ना. उदय सामंत

Jul 16, 2024 - 11:59
 0
रत्नागिरी : स्टरलाईटच्या ५३० एकरपैकी पाच एकर जागेवर घनकचरा प्रकल्प - ना. उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा घनकचर्‍याचा प्रश्‍न अखेर मार्गी लागणार असून स्टरलाईटची ५३० एकर जागा एमआयडीसीने ताब्यात घेतल्याने त्यातील ५ एकर जागेवर घनकचरा प्रकल्प उभा केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी शहराचा घनकचर्‍याचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. दांडेआडम येथे नगर परिषदेच्या मालकीची जागा आहे. त्या जागेत घनकचरा प्रकल्प उभा केला जाणार होता. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले होते. न्यायालयात नगर परिषदेच्या बाजूने निकाल लागूनदेखील स्थानिक ग्रामस्थांचा त्याला तीव्र विरोध झाल्याने घनकचर्‍याचा प्रश्‍न प्रलंबित होता. नगर परिषदेने अनेक ठिकाणी जागांची पाहणी केली होती. तत्कालिन नगराध्यक्ष राहुल पंडीत यांच्या कारकिर्दीत नगर परिषद आवारातच एक छोटा घनकचरा प्रकल्प डेमो स्वरुपात सुरु करण्यात आला होता. मात्र तोदेखील कालांतराने बंद झाला. शहरात कचर्‍याची समस्या गंभीर बनत आहे. साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी निर्माण होत असते. हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

शहरानजिकच्या उद्यमनगर परिसरात असलेल्या स्टरलाईटच्या जागेचा निकाल सुप्रीम कोर्टात एमआयडीसीच्या बाजूने लागला. या निकालानंतर एमआयडीसीने जवळजवळ ५३० एकर जागा ताब्यात घेतली आहे. याठिकाणी काही उद्योग प्रस्तावित असून यातील ५ एकर जागा रत्नागिरी नगरपरिषदेला देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या जागेवर नगर परिषद आपला घनकचरा प्रकल्प उभा करेल. शहरासह लगतच्या ग्रामपंचायतींचा कचरादेखील आणला जाईल, अशी माहिती ना. सामंत यांनी दिली.

स्टरलाईटमध्ये ज्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या होत्या ते शेतकरी पुन्हा जागा द्या अशी मागणी करतायत. मात्र नियमात तशी जागा देता येतनाही. एमआयडीसीचे कायदे-कानून हे वेगळे आहेत. आपण स्वत: त्या शेतकर्‍यांशी चर्चा केली आहे. त्यांना खास बाब म्हणून प्रत्येकी २ गुंठे जागा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या एका वारसाला नोकरी देण्याचे आश्‍वासनदेखील ना. सामंत यांनी दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow