दाभोळत सहा वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन केली भात लागवड

Jul 17, 2024 - 12:15
Jul 17, 2024 - 17:17
 0
दाभोळत सहा वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन केली  भात लागवड

साखरपा : विविध  गावांमधून वेगवेगळ्या प्रथापरंपरा श्रद्धेने जोपासल्या जाताना दिसतात. दाभोळे या गावातही अशीच एक प्रथा गेली सात पिढ्या जपली जात आहे. ती परंपरा म्हणजे देवीच्या शेताची लावणी परंपरा. दाभोळे गावाची देवी पावणादेवी हे मोठे श्रद्धास्थान आहे. या देवीचे एक शेत म्हणून उंबर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावणादेवीचे वहिवाटदार या नावानेही हे शेत ओळखले जाते. ग्रामस्थ (कै.) सोना गणू सुकम हे शेताचे वहिवाटदार. सध्या त्यांचे सख्खे वारस अस्तित्वात नसले तरी त्यांची भावकी गावात राहाते. त्या भावकीकडून आणि ग्रामस्थांकडून या शेताची परंपरा जोपासली जात आहे. शेताचा कवळ तोडणीपासून ते कापणीपर्यंतचा सगळा कारभार गावातील सहा वाड्यांमधील ग्रामस्थ एकत्र येऊन करतात. एकूण २८ गुंठे क्षेत्र असलेले हे शेत खालची आणि वरची सुकमवाडी, खालची आणि वरची गुरववाडी, परडेवाडी आणि पितळेवाडी येथील ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात भातशेतीच्या हंगामातील कामे करतात. पूर्वी हे शेत दाभोळे गावाच्या हद्दीत येत असले तरी आता हे बोरिवले गावात मोडते.

शेताच्या लावणीचा सोहळा बघण्यासारखा असतो. अवघे २८ गुंठे क्षेत्र असलेल्या शेतात सहा वाड्यांमधील सुमारे २५० ते ३०० ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने लावणीसाठी जमतात. पूर्वी बैलांची जोते फिरवून नांगरणी करून लावणी लावली जायची. जोतांची जागा आता पॉवरटिलरने घेतली.

उत्पन्न देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी
लावणीप्रमाणेच शेतात कापणीही सहा वाड्यांमधील ग्रामस्थ एकत्र येऊन करतात. मिळालेले उत्पन्न हे देवस्थानचे असल्यामुळे वर्षभरातील देवीच्या धार्मिक कार्यक्रमात ते वापरून उर्वरित भाताची विक्री केली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:43 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow