धामणसे ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

Jul 19, 2024 - 09:27
 0
धामणसे ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

रत्नागिरी : धामणसे गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच वह्यांचे वाटप करण्यात आले. यापुढेही शाळांच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायत योग्य ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही सरपंच अमर रहाटे यांनी दिली.

धामणसे गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी श्री. रहाटे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

याप्रसंगी उपसरपंच अनंत जाधव सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. गावातील एकही विद्यार्थी शिक्षण साहित्याशिवाय वंचित राहू नये, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताराम चव्हाण, माजी सरपंच विलास पांचाळ, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दीपक जाधव, माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकुंद जोशी, श्रीरत्नेश्वर ग्रंथालयाचे संचालक प्रशांत रहाटे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश जोशी, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, ग्रंथपाल केशव कुळकर्णी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव सुनील लोगडे आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ दीपक सांबरे यांनी या वेळी या उपक्रमाचे कौतुक करून राजकारण विरहित ग्रामपंचायतीचे काम असून ग्रामपंचायतीचे सरपंच अमर रहाटे व त्यांचे सर्व सहकारी यांचे विशेष आभार मानले भविष्यात असेच आपण कार्यक्रम व उपक्रम घ्यावेत असा असे मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच विलास पांचाळ यांनी सरपंचांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक तथा रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी सरपंच अमर रहाटे यांचे भरभरून कौतुक केले. माजी सरपंच दत्ताराम चव्हाण यांच्या मनोगतातून ग्रामस्थांच्या माध्यमातून व सहकार्यातून असे उपक्रम आपण वेळोवेळी करत जा. आम्ही या उपक्रमासाठी निश्चितपणे आपल्यासोबत आहोत असे सांगितले. मुख्याध्यापक अविनाश जोशी यांनी शैक्षणिक विषयाचे महत्त्व ग्रामस्थ विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मुकुंद जोशी यांनी या उपक्रमाबाबत बोलताना आजपर्यंतच्या झालेल्या सरपंचांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहेच. हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या घेतल्यामुळे निश्चित याचा आनंद वाटतो आहे, या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीला शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात उमेश कुळकर्णी म्हणाले की, ग्रामपंचायतच्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला गावातील सर्वपक्षीय ज्येष्ठ मंडळींची उपस्थिती आहे याचा अर्थ ग्रामपंचायतचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

याप्रसंगी अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक, आशासेविका, ग्रामपंचायत सदस्य संजय गोनबरे, समीर सांबरे, वैष्णवी धनावडे, रेश्मा डाफले, ऋतुजा कुलकर्णी, यासोबत ग्रामसेवक श्री. जड्यार, लिपिक शुभांगी सांबरे, संगणक सहाय्यक तनया वारसे, शिपाई मोहन पवार व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow