रत्नागिरी : जिल्हास्तरीय स्वच्छता आदरातिथ्य समितीवर राजू भाटलेकर यांची निवड

Jul 19, 2024 - 15:25
 0
रत्नागिरी : जिल्हास्तरीय स्वच्छता आदरातिथ्य समितीवर राजू भाटलेकर यांची निवड

त्नागिरी : जिल्हास्तरीय स्वच्छता आदरातिथ्य समितीवर रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने राजू भाटलेकर यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे.

केंद्र शासन स्तरावरून स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग इन हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटीबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्हास्तरीय समिती व पडताळणी उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्यावर सुहास तथा राजू विलास भाटलेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारीकीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी तुषार बाबर, सदस्य सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल देसाई, जिल्हा पर्यटन विभाग प्रतिनिधी दीपक माने यांचा समितीमध्ये समावेश आहे.

स्वच्छ भारत मिशनचा टप्पा क्र. २ हा केंद्र शासनाचा राष्ट्रीय प्रमुख कार्यक्रम आहे. जो ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी राबवण्यात येत आहे. त्यामध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम व वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रे वॉटर, मैला गाळ व्यवस्थापन अशी कामे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात रिसॉर्ट, हॉटेल, होम स्टे व धर्मशाळा यांसारख्या राहण्याच्या आदरातिथ्याच्या अनेक सुविधा रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या सुविधांमधून स्वच्छता राखण्याबाबत काटेकोर कार्यवाही होत असते. परंतु ज्या ठिकाणी आदरातिथ्य, राहण्याच्या सुविधा आहेत, अशा चालकांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ओडीएफ (ओपन डिफेक्शन फ्री) दर्जा प्राप्त करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींना सहकार्य करणे आवश्यक आहे. यासाठी आदरातिथ्य पुरवणाऱ्या चालकांनी पुरेशा पायाभूत सुविधांचा विकास करणे, चांगल्या पद्धतींचा अवलंब करणे, जबाबदार पर्यटनाचा एक भाग म्हणून स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करणे अपेक्षित असल्याने केंद्र शासनाने पर्यटन क्षेत्रात स्वच्छता शाश्वत राहण्यासाठी स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग अभियान सुरू केले आहे.

आदरातिथ्य सुविधा पुरवणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी या सर्वामध्ये स्वेच्छेने सहभागी होणे गरजेचे आहे. सुविधा क्षेत्रामध्ये चांगल्या स्वच्छतेच्या सवयी, जनजागृतीसह पायाभूत सुविधांमधील शिल्लक असलेली तफावत भरून काढण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करत असणारे राजू भाटलेकर यांची निवड झाल्य़ाने सर्व पर्यटन व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow