लांजा वरिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

Jul 23, 2024 - 11:14
Jul 23, 2024 - 14:28
 0
लांजा वरिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

लांजा : शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ व लांजा वरिष्ठ महाविद्यालय कडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने विद्यार्थ्यांना चालताना तर वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित यंत्रणेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

शाळेतील मुले जाणारा रस्ता बिकट असल्याचे पाहून एका पालकानेच या रस्त्यावर खट्टे भरण्यासाठी चिरा आणून ठेवला आहे. लांजा साटवली तिठा ते पत्की डॉक्टर दवाखाना हा जिल्हा परिषद मार्ग आहे. या रस्त्यावरील साईडपट्ट्या गायब झाल्या असून, मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता पूर्णतः खराब होऊन माती चिखल निर्माण झाला आहे. खड्यामध्ये पावसाचे पाणी साठवून राहिल्याने रस्ता आहे की, गटार अशी परिस्थिती झाली आहे. या मार्गावरून वाहनांची दिवसा-रात्री मोठी रहदारी असते. लांजा शहरातील शाळा क्रमांक ५ ही मॉडेल स्कूल या मार्गावर आहे. या शाळेत मोठी विद्यार्थी पटसंख्या असून शहराबाह्य विदयार्थी शाळेत येत असतात. शालेय वेळेत या रस्त्यावर विद्यार्थी पालक यांची नियमित गर्दी असते. पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनला आहे. बऱ्याचदा रस्त्यावरून विद्यार्थी चालत असले की, वाहनाचे पाणी त्यांच्यावर उडून गणवेश खराब होण्याचे प्रकार घडत आहेत.

खराब रस्त्यामुळे वाहनांची कोंडी झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर सिनकर यांच्या घरापासून सिनिअर कॉलेजकडे जाणारा रस्ताही अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यांना कोणीच वाली नाही असे दिसून येते आहे. या रस्त्याने रोज हजारो विद्यार्थी नागरिक ये-जा करीत असतात. संपूर्ण तालुक्यातूनच नव्हे तर शेजारच्या तालुक्यातून विद्यार्थी कॉलेजला येतात. लांजा शहरातील शैक्षणिक दालनाकडे जाणाऱ्या या दोन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्ता तातडीने सुस्थितीत करावा, अशी मागणी पालक करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow