रत्नागिरी : जिल्हा बँकेकडून सभासदांना विक्रमी 30 टक्के लाभांश वाटप

Jul 27, 2024 - 09:39
 0
रत्नागिरी : जिल्हा बँकेकडून सभासदांना विक्रमी 30 टक्के लाभांश वाटप

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना 30 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सहकार क्षेत्रातील हा विक्रमच समजला जात आहे. सभासदांना ३० टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात लाभांश वाटप करणारी जिल्हा बँक ही पहिलीच बँक ठरली असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

थिबापॅलेस येथील जयेश मंगल कार्यालयात जिल्हा बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ.सुधीर गिम्हवणेकर, उपसरव्यवस्थापक श्री.अजित नाचणकर, श्री.राजन होतेकर, श्री.श्रीकृष्ण खेडेकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने नफा वाटणीत 30 टक्के लाभांश सभासदांना देण्याची शिफारस केली होती. या शिफारशीला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटासह मंजुरी दिली. जिल्हा बँकेमार्फत गेली अनेक वर्षे सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात आला. गतवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी आश्वासित केल्याप्रमाणे यावर्षी सभासदांनी 30 टक्के लाभांश देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याने डॉ.चोरगे यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्यासाठी गेले वर्षभर बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेऊन बँकेने 4600 कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. यावर्षी बँकेने चांगला नफा मिळवून नाबार्ड, आरबीआयच्या सर्व तरतुदींचे पालन करून सभासदांना 30 टक्के लाभांश दिला असून संचालक मंडळाला याचा अभिमान आहे. 25 टक्के लाभांश, 5 टक्के शेअर्स सभासदांना देण्यात आले आहे.

बँकेने जाहीर केलेल्या 30 टक्के रकमेची नफा वाटणी करण्यात आली. सभासदांना 5 टक्के बँक शेअर्स खरेदी करताना देण्यात येणारी रक्कम एक हजार रुपयांच्या प्रतिभागाच्या पटीत नसल्यास सदरची रक्कम एक हजार रुपयांच्या पटीत करण्यात आली. आवश्यक रक्कम सभासदांना देण्यात येणाऱ्या 25 टक्के लाभांशातून घेण्यात येणार आहे. दि.29 जुलै रोजी सभासदांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. सुमारे तीन हजार सभासदांना लाभांशाची रक्कम देण्यासाठी जिल्हा बँकेला 18 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बँकेचे माजी कार्यकारी संचालक श्री.सुनिल गुरव, समर्थ भंडारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.प्रभाकर आरेकर, श्री.सुधाकर सावंत, श्री.अशोक कदम, श्री.राकेश जाधव, प्रियदर्शिनी ग्रामीण पतसंस्था देवरूखचे अध्यक्ष श्री.हनिफ हरचिरकर, श्री.दीपक राऊत, श्री.सुरेश सावंत, श्री.शामराव सावंत, श्री.सुनिल टेरवकर, श्री.विनायक मोहिते आदींनी आपल्या मनोगतातून सर्वाधिक लाभांश दिल्याबद्दल जिल्हा बँकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक संस्थांनी डॉ.तानाजीराव चोरगे, बाबाजीराव जाधव यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांची बँक खऱ्या अर्थाने नावारूपाला आली आहे. बँकींग क्षेत्रातील आधुनिक सर्व सेवासुविधा ग्राहकांना पुरविण्यात आल्या आहेत. यात युपीआय, आयएमपीएस, क्युआर कोड, मोबाईल बँकिंग आदी सुविधांचा समावेश आहे. मार्च 2024 अखेरील ताळेबंदाचा आढावा सादर करण्यात आला. बँकेच्या एकूण ठेवी 2636.17 कोटी, 2004.30 कोटी रुपयांची कर्जे, 97 टक्के वसुली करण्यात आली आहे. सलग 12 वर्षे शुन्य टक्के एनपीए असून 68 कोटी 53 लाख रुपयांचा जिल्हा बँकेला ढोबळ नफा झाला आहे. 59.64 कोटी रुपयांचे भागभांडवल असून सतत 13 वर्षे ‘अ’ ऑडीट वर्ग जिल्हा बँकेला मिळाला आहे. जिल्हा बँकेला अद्यापपर्यंत 17 विविध पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हा बँकेच्या 23 शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. पुढील काही वर्षात शाखा कार्यालये स्वमालकीच्या जागेत सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.

विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळाने विशेषतः अध्यक्षांनी काळजीपूर्वक सोसायट्यांच्या कारभारावर लक्ष ठेवावे. कारण सध्या काही सोसायट्यांच्या सचिवांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व सभासदांकडून जिल्हा बँकेला मिळालेले सहकार्य, विश्वास याबद्दल डॉ.चोरगे यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा बँकेला भविष्यात अशाच प्रकारचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा डॉ.तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजय चव्हाण यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन केले. उपस्थित सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले. जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात, आनंदात संपन्न झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. उपस्थितांपैकी काही मान्यवरांनी आपल्या मनोगतात 30 टक्के लाभांश दिल्याबद्दल जिल्हा बँकेचे विशेष अभिनंदन केले. जिल्हा बँकेने भविष्यात यशाची सर्व शिखरे पार करून उज्ज्वल यश संपादन करावे अशी सदिच्छा मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. उपाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांनी आभार मानले. जिल्हा बँकेच्या सर्व सभासदांनी केलेले सहकार्य, दाखविलेला विश्वास याबद्दल श्री.जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात जिल्हा बँक अधिक जोमाने काम करील असा विश्वास श्री.बाबाजीराव जाधव यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow