Ratnagiri :'आर्जु'पाठोपाठ आणखी एका कंपनीने गाशा गुंडाळला...

Jun 1, 2024 - 09:49
 0
Ratnagiri :'आर्जु'पाठोपाठ आणखी एका कंपनीने गाशा गुंडाळला...

◼️ कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय बंद, कर्मचाऱ्यांसहित संचालकांचेही फोन नॉटरिचेबल

रत्नागिरी : रत्नागिरीकरांना आर्जु टेक्सोल कंपनीने गंडा घातलेला असतानाच रत्नागिरीतील छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून पिग्मी गोळा करणार्‍या ‘महामुंबई’तील एका कंपनीने लाखो रुपयांना चुना लावल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेले चार-पाच दिवस या कंपनीचे कार्यालय बंद असून, कर्मचारी आणि संचालकांचेही फोन नॉटरिचेबल येऊ लागल्याने, पिग्मीधारक अडचणीत आले आहेत.

रत्नागिरीकरांना गेल्या काही वर्षात अनेक कंपन्यांनी लुबडल्याच्या घटना समोर असतानाही, जादा रकमेच्या मोबदल्यापोटी गुंतवणूक होऊन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रत्नागिरीत वर्ष-दीड वर्षापूर्वीच आलेल्या महामुंबईतील एका कंपनीने येथील स्थानिक छोट्यामोठ्या व्यापार्‍यांकडून पिग्मी स्वरुपात नियमित रक्कम गोळा करण्यास सुरुवात केली. अनेक व्यावसायिकांनी बचत होईल या उद्देशाने पिग्मीही सुरु केली.

पिग्मी गोळा करणार्‍या एजंटने पिग्मीचे प्रमाण वाढवावे म्हणून चांगले काम करणार्‍यांना देशांतर्गत अनेक मोठ्या शहरांचे विमानप्रवासही घडवून आणले. त्यामुळे पिग्मी एजंटनी अनेक व्यापार्‍यांना पिग्मीसाठी तयार करुन, नियमित पिग्मी सुरु केली होती. दिवसाची लाखो रुपयाची रक्कम यातून गोळा होत होती.

परंतु गेल्या सप्टेंबर महिन्यापासून पिग्मीची मुदत झालेल्यांना पैसे परत देण्यास या कंपनीकडून टाळाटाळ सुरु झाली होती. काहींचे धनादेशही परत आल्याने, त्यांनीही पैसे मिळवण्यासाठी पाठपुरवठा सुरु केला होता. त्यानंतरही ही पिग्मी गेले काही महिने सुरु राहिली. परंतु मागील पाचसहा दिवसांपासून या कंपनीचे कार्यालय बंद आहे. शहरातील साळवीस्टॉप परिसरात हे कार्यालय असून, त्याचे भाडेही थकवले गेले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

व्यापार्‍यांनी पिग्मी एजंटकडे पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर काहींनी घरातील दागिने ठेवून पिग्मीची काही रक्कमही दिल्याचे बोलले जात आहे. परंतु नवीमुंबईत असणार्‍या या कार्यालयात जाणार्‍या एजंटांनाही आता तेथील ऑफीस बंद असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे या कंपनीने गाशा गुंडाळल्याची चर्चा व्यापार्‍यांमध्ये असून, तेही आता हवालदिल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow