चिपळूण : शिव, वाशिष्ठी नदीत पुन्हा सापडले मांसाचे तुकडे
चिपळूण : शहरात पुन्हा एकदा शिव, वाशिष्ठी नद्यांत टाकाऊ मांसाहारी पदार्थ टाकण्यास सुरुवात झाली असून, परिणामी या पदार्थांवर ताव मारण्यासाठी मगरींचा संचारदेखील वाढत आहे. दुसरीकडे पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाने शहरात मोकाट फिरणाऱ्या गाढवांच्या मालकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देऊनही संबंधित मालकांनी पुन्हा एकदा गाढवे मोकाट सोडण्यास सुरुवात केली आहे.
शहरात शिव आणि वाशिष्ठी नद्यांत गेल्या काही वर्षांपासून मटण, चिकन विक्रेत्यांकडून नदीचे पाणी दूषित करण्याचा उद्योग सुरू केला आहे. संबंधितांना न.प. प्रशासनाकडून अनेक वेळा ताकीद देण्यात आली आहे. टाकाऊ मांसाचे तुकडे टाकणाऱ्या काही विक्रेत्यांना रंगेहाथ पकडून त्यांना कारवाईबाबत इशाराही देण्यात आला आहे. यामुळे काही कालावधीपर्यंत नदीमध्ये संबंधितांकडून टाकाऊ मांसाहारी पदार्थ टाकण्याचा प्रकार थांबला होता.
स्वच्छता अभियानांतर्गत न.प. प्रशासनासह सामाजिक संस्था, पर्यावरण व निसर्गप्रेमी संस्था, धर्माधिकारी प्रतिष्ठान, नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांच्या सहभागाने स्वच्छता अभियान राबवून नद्या स्वच्छ केल्या जातात. मात्र, बेजबाबदार व्यावसायिकांकडून जल प्रदूषणासह नदीचे पात्र खराब करण्याचे काम सुरू आहे.
चिपळूण न. प. प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वी शहरातील मोकाट गाढवांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईबाबत संबंधित मालकांना इशारा दिला होता, संबंधित २० ते २२ मालकांची बैठक घेऊन, गाढवे मोकाट सोडू नका; अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल. तसेच पाच हजार रुपयांचा दंड तसेच अपघात झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल व मोकाट गाढवे ताब्यात घेतल्यानंतर ती परत दिली जाणार नाहीत, अशी सक्त ताकीद दिली होती. त्याचा परिणाम पंधरा दिवसांपर्यंत टिकला. आता पुन्हा एकदा शहरात मोकाट गाढवे दिसून येत आहेत. त्यांच्या मालकांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मगरींचा नागरी वस्तीत वावर
काही विक्रेत्यांकडून पुन्हा एकदा शिव नदी परिसरात टाकाऊ मटण, मच्छी व चिकनचे तुकडे टाकण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. हे टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिव व वाशिष्ठी नद्यांत मगरी येत आहेत. परिणामी, या मगरी अनेक वेळा नागरी वस्तीमध्येही शिरकाव करू लागल्या आहेत. त्याचा धोका नागरिकांना आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 05/Aug/2024
What's Your Reaction?