अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या अडचणी वाढल्या; नासा'ने दिली मोठी अपडेट

Aug 8, 2024 - 13:52
 0
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या अडचणी वाढल्या; नासा'ने दिली मोठी अपडेट

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या काही दिवसापासून अंतराळात अडकले आहेत. ते ५ जून रोजी स्टारलाइनर बोईंगमधून अंतराळात गेले आहेत. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते अडकले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून ते परतण्याबाबत प्रतिक्षा सुरू आहे. ते दोघेही १३ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र २ महिने उलटूनही ते अजूनही परतले नाहीत. यावर आता नासाने आणखी एक अपडेट दिली आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासा स्टारलाइनरशिवाय इतर पर्यायांचा विचार करत आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परत पृथ्वीवर येण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

याबाबत नासाने काल रात्री उशिरा अपडेट दिली. 'स्टारलाइनर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळातून परत आणण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला आहे. नासाने विचारात घेतलेल्या पर्यायांपैकी एक म्हणजे फेब्रुवारी २०२५ पर्यंत या दोघांना अवकाशातून परत आणता येईल. हा पर्याय अंमलात आणल्यास, नासा स्टारलाइनर वापरण्याऐवजी इलन मस्क यांच्या स्पेसएक्सद्वारे या दोघांना परत आणेल, असं नासाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले की, बुच आणि सुनिता यांना स्टारलाइनरद्वारे परत आणणे हा नासाचा पहिला पर्याय आहे. पण हे शक्य नसेल तर आमच्याकडे इतर अनेक पर्याय आहेत. नासा स्पेसएक्स सोबत क्रू ९ अवकाश मोहिमेवर पाठवण्यासाठी काम करत आहे, त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की गरज पडल्यास आम्ही क्रू ९ मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा समावेश करू, असंही स्टीव्ह स्टिच म्हणाले.

नासाने अद्याप या योजनेला मान्यता दिलेली नाही

क्रू ९ चा संदर्भ देत, नासाच्या अधिकाऱ्याने दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाने कोणती रणनीती आखली आहे हे सांगितले. त्यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना २०२५ पर्यंत परत आणणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले की, क्रू ९ साठी आम्ही येथून फक्त दोन अंतराळवीर पाठवू, क्रू ९ चा भाग म्हणून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात जातील. स्टेशनवर काम करेल आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२५ पर्यंत चार अंतराळवीरांना परत आणले जाईल. नासाने अद्याप या योजनेला मान्यता दिलेली नाही, फक्त त्यावर विचार केला जात आहे.

NASA ने मंगळवारी SpaceX Crew 9 मिशनला उशीर झाल्याची घोषणा केली होती, हे मिशन या महिन्यात निघणार होते, पण आता ते २५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. क्रू 9 मिशनद्वारे ४ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले जाणार आहे. स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे ही मोहीम प्रक्षेपित केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow