स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अवघे जीवन मातृभूमीसाठीच वाहिले : डॉ. धनश्री लेले

Aug 20, 2024 - 12:51
 0
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अवघे जीवन मातृभूमीसाठीच वाहिले : डॉ. धनश्री लेले

त्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण जीवन भारत देशासाठी अर्पण केले. त्यांचे मनही मातृभूमीसाठी समर्पित होते, असे उद्गार ख्यातनाम वक्त्या डॉ. धनश्री लेले यांनी काढले.

शंभर वर्षांपूर्वी सदाशिव राजाराम रानडे यांनी लिहिलेल्या "स्वातंत्र्यवीर बॅ. तात्याराव सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा माखजन हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात झाला. त्यावेळी त्या स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकर या विषयावर बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड वाचन, जागतिक इतिहासाचा अभ्यास, महाकाव्याचे रचयिते काव्याचे अनेक प्रकार ज्यांनी हाताळले असे महाकवी, थोर क्रांतिकारक, साहित्यिक स्वा. सावरकर अफाट राष्ट्रप्रेम, अद्वितीय देशासाठी त्याग वंदनीय आहे. पराकोटीच्या यातना सहन करणाऱ्या या लोकोत्तर जीवनाचे पहिले चरित्र शंभर वर्षांनी पुनर्प्रकाशित होत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. द्वितीय आवृत्तीच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखिका, अभिनेत्री, संवादिका, निवेदिका, संपदा जोगळेकर-कुलकर्णी म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा काही एका वंशापुरता नाही, तो वारसा विचारांचा आहे. उत्तम वक्ता, उत्तम लेखक, उत्कृष्ट कवी, इतिहासकार, इतिहास घडविणारे, स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ असे सावरकर पुन्हा होणे नाही. परंतु अक्षर साहित्य नेहमीचेच मनावर खोल परिणाम साधते, असा अनुभव आहे. अशा स्वतःच्या कार्यातून व शब्दसंपदेतून त्यांनी पुन्हा 'राष्ट्रप्रेमी' जन्माला घालण्याची तरतूद करून ठेवली आहे, हे मात्र निश्चित. मनोरमा प्रकाशनच्या विद्या फडके म्हणाल्या की, १५ ऑगस्ट १९२४ म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी २५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत हे पुस्तक प्रकाशित करणे हे त्यांचे फार मोठे धाडसच होते. कारण माखजनसारख्या कोकणातल्या अशा गावातील व्यक्तीने हे लिहिणे व प्रकाशित करणे खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. लेखकाने सावरकरांच्या आयुष्यातील घटनांचा, त्यांचा राष्ट्रकार्याचा फारच मार्मिक अभ्यास करून, ते चरित्र मोजक्या प्रसंगात बसविले आहे. सावरकरांचे समग्र साहित्य, देशासाठी दिलेली आयुष्याची आहुती याविषयी त्रोटक बोलायचे म्हणजे वक्त्याची कसोटीच आहे. कलांगणचे श्रीनिवास पेंडसे म्हणाले की प्रकाशन सोहळ्याचा साक्षीदार होण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. सफर संगमेश्वर देवरूखची या पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट यांच्यामुळे तिसरे पुस्तक लिहिण्याची संधी कलांगणला मिळाली. याचा कलांगणला निश्चित आनंद आहे. स्वातंत्र्यवीर बॅ. सावरकरांनी स्वतःचा गौरव कधीही केला नाही, तर त्यांनी देशाचा गौरव करण्यातच मनस्वी धन्यता मानली. अशाच प्रकारची देशसेवा प्रत्येकाने अंगीकारली तर खऱ्या अर्थाने आपण सावरकरप्रेमी आहोत असे म्हणता येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय रानडे यांनी केले. सोहळ्याचे आयोजन, त्यासाठी दाखवलेली तत्परता, घडवून आणलेला सोहळा या बाबी आम्हा रानडे कुटुंबासाठी अभिमानास्पद वाटतात, असे ते म्हणाले. 

स्वा. सावरकरांच्या जयोस्तुते.... या गीताचे गायन माखजन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात करून सोहळ्याला सुरुवात केली. सागरा प्राण तळमळला.... या गीताच्या सागर गुरव यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचं उत्कृष्ट व लक्षवेधी सूत्रसंचालन निवेदक, संवादक निबंध कानिटकर यांनी केले. शरद रानडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माखजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय बापट, लेखक सदाशिव राजाराम रानडे यांच्या कन्या श्यामला श्रीधर पोंक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow