Apple कंपनीच्या उच्च पदावर आणखी एक भारतीय
मुंबई : आयफोन निर्माती कंपनी Apple Inc ने आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल केले असून भारतीय वंशाचे केविन पारेख यांची कंपनीचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. केविन पारेख हे आता लुका मेस्त्रींची जागा घेणार आहेत.
केविन पारेख हे Apple मध्ये गेल्या 11 वर्षांपासून काम करत आहेत. कंपनीच्या आर्थिक रणनीती आणि कामकाजात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 52 वर्षीय केविन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीए केले. केविन पारेख हे थेट टीम कुक यांना रिपोर्ट करतात आणि त्यांच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. iPhone 16 लवकरच बाजारपेठेत येणार असून त्या पार्श्वभूमीवर अॅपवने आपल्या टीममध्ये मोठा बदल केल्याचं दिसतंय.
लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केविन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेल्या अनेक महिन्यांपासून केविन पारेख यांना सीएफओच्या भूमिकेसाठी तयार करत होते.
याआधी केविन पारेख यांनी विक्री, किरकोळ आणि विपणन विभाग देखील हाताळले आहेत. त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाची चांगली माहिती आहे. केविन पारेख यांनी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम केले आहे. ते चार वर्षे रॉयटर्सचे उपाध्यक्ष होते. त्यांनी जनरल मोटर्समध्ये व्यवसाय विकास संचालक म्हणूनही काम केलं आहे.
अॅपलचे सीईओ टीम कुक म्हणाले की, नवीन सीएफओ केविन पारेख यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो बऱ्याच काळापासून अॅपलच्या टीमचा भाग आहेत. लुका मेस्त्री म्हणाले की, मी माझ्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साहित आहे. मला पूर्ण आशा आहे की केविन पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 28-08-2024
What's Your Reaction?