तेलही गेले तूपही गेले आणि आता आरजू कंपनीचे ऑफिसही गेले...

May 25, 2024 - 16:40
 0
तेलही गेले तूपही गेले आणि आता आरजू कंपनीचे ऑफिसही गेले...

रत्नागिरी : कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरजू कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल होताच या कंपनीच्या ऑफिसची जागा मूळ मालकाने काढून घेतली आहे. यासंदर्भातील एक फलक या कंपनीच्या गेटवर लावण्यात आला आहे. आरजू टेकसोल या कंपनीचे ऑफिस एमआयडीसी येथील एका इमारतीत होते. या इमारतीचे मालक शकील मोडक यांनी आरजू कंपनीसोबत केलेला भाडेकरार रद्द केला असल्याचा बोर्ड या इमारतीच्या गेटवर लावण्यात आला आहे. सदर मिळकतीशी आरजू टेकसोल प्रा. ली. यांचा कोणताही सबंध राहिला नसल्याचे गेटवर लावण्यात आलेल्या सूचनेत म्हटले आहे. कंपनीचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, गुंतवणूकदार तसेच ग्राहकांनी या इमारतीत प्रवेश करू नये व तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. आजवर पैसे मागायला जाणाऱ्या गुंतवणूकदारांना या कंपनीच्या ऑफिसला तरी जाता येत होते; आता ते देखील या ठिकाणी नसल्याने डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
रोजगार देतो असे सांगत लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक केल्याची बातमी सुमारे महिनाभरापूर्वी रत्नागिरी खबरदार मधून प्रसिद्ध झाली होती. मात्र या कंपनीचे संचालक आपले पैसे परत करतील या आशेवर अनेकजण पोलिसात तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. काल अखेर एका गुंतवणूकदाराने पुढे येत आपली १८ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात स्थानकात दिली आहे. या तक्रारी नुसार आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्यावर भा.दं.सं.क. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपींनी जून २०२१ मध्ये आरजू टेक्सोल हि कंपनी स्थापन केली होती. २५ हजार ते ४० लाख रुपये पर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या स्कीम सांगून आरोपींनी फिर्यादी यांना खिळे बनवण्याचे अॅटॉमिक मशीन, कच्चा माल तसेच माल तयार केल्यावर मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या १८ लाख रुपयांवर १६ टक्के प्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो तसेच १५ महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देतो असे देखील सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे अॅग्रीमेंट देखील करून देतो असे आरोपींनी सांगितले होते. मात्र अजावर असे कोणतेही अॅग्रीमेंट केले नाही व मोबदला म्हणून कोणतीही रक्कम देखील दिली नाही असे तक्रारदराचे म्हणणे आहे. आरोपींनी संगनमताने १८ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार दराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow