येत्या ४८ तासांत 'रेमल' चक्रीवादळ धडकणार..., महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ?

May 25, 2024 - 17:03
May 25, 2024 - 17:07
 0
येत्या ४८ तासांत 'रेमल' चक्रीवादळ धडकणार..., महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ?

मुंबई : बंगालच्या उपसागरात महाराष्ट्रापासून १ हजार ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर तयार होत असलेल्या 'रेमल' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कुठलाही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगीचच घाबरून जाऊ नये तसेच सोशल मीडियावरील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवून इतरांना देखील घाबरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

...असे पडले 'रेमल' नाव!
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल' हे नाव ओमानने सुचवले आहे आणि अरबी भाषेत त्याचा अर्थ 'वाळू' असा होतो.

येथे होईल‌ पाऊस
'रेमल' चक्रीवादळामुळे वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. तसेच विजांच्या गडगडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने म्हणजे सायकल जास्तीतजास्त ज्या वेगाने व्यक्ती चालवते त्या वेगाने वारे वाहतील त्यामुळे मच्छीमारांना बंगालच्या उपसागरात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

'रेमल' नंतर 'आसना'
'रेमल' चक्रीवादळ रविवारी २६ मे २०२४ रात्री किंवा सोमवारी २७ मे २०२४ नंतर बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर धडकू शकेल. 'रेमल' चक्रीवादळानंतर आसना, दाना, फेंगल, शक्ति, महिना, सेयर, दितवाह अशी पुढील सात चक्रीवादळांची नावे असतील, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे ही सर्व चक्रीवादळांची नावे साधारणतः जून २०२६ पर्यंत आपल्याला पहायला मिळणार असल्याचे वृत्त आहे.

चक्रीवादळ निर्माण होणे ही संथ नैसर्गिक घटना
चक्रीवादळ निर्मिती ही संथ नैसर्गिक घटना आहे. नॅशनल हरिकेन सेंटर नुसार, १९९४ मधील 'जॉन' नावाचे चक्रीवादळने तयार होऊन नष्ट होण्यासाठी ३१ दिवसांचा कालावधी घेतला होता तर पश्चिमी प्रशांत महासागरात, २०१३ मधील बनलेल्या 'हैयान' या चक्रीवादळाने १३.५ दिवस इतका कालावधी घेतला होता.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 25-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow