राज्यभरात होणारी पोलिस भरती पुढे ढकला; निलेश लंकेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jun 18, 2024 - 11:44
 0
राज्यभरात होणारी पोलिस भरती पुढे ढकला; निलेश लंकेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच १९ जूनपासून सुरूवात होणार आहे.

दरम्यान, ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे.

यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. तसेच, पाऊस सुरू असल्यामुळे पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील १७ हजार ४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राज्यात सुरू होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी १७ हजार ४७१ रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

अहमदनगरमध्ये पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार
अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, बँड पथक आणि चालक पदांसाठी उद्या (१९ जून) पहाटे पाच वाजल्यापासून पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस दलातील शिपाई २५, तर चालकाच्या ३९ जागा रिक्त आहेत. यातील पोलीस शिपाई पदासाठीच्या २५ जागांपैकी तीन जागा बैंड पथकासाठी राखीव आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow