राजापूर : देवाचेगोठणे येथे 'जलजीवन'चे काम निकृष्ट; ग्रामस्थांकडून कामाच्या चौकशीची मागणी

Jun 24, 2024 - 12:33
Jun 24, 2024 - 15:35
 0
राजापूर : देवाचेगोठणे येथे 'जलजीवन'चे काम निकृष्ट; ग्रामस्थांकडून कामाच्या चौकशीची मागणी

राजापूर : 'हर घर जल' चा नारा देत शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी कोट्यवधी रूपये खर्चुन हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी परस्परांशी हातमिळवणी करून का योजनेच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करून घेतले असून याबाबत आता त्या-त्या गाय व वाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या योजनेंतर्गत झालेल्या दर्जाहीन कामांची पोलखोल केली आहे.

राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे गावात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. प्रत्यक्षात या योजनेचा लाभ जनतेला होण्याऐवजी अधिकारी आणि ठेकेदार यांनीच घेतला असून स्थानिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी कामांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचे नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक कामांबाबत यापुर्वीच माजी खासदार नीलेश राणे यांनी आवाज उठविलेला असून आता पुन्हा एकदा राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे गावातील या योजनेंतर्गत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी पुढे येताच राणे यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत कामाचे ऑडिट करण्याची मागणी करत या सर्व कामांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे नीलेश राणे यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सध्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' ही योजना राबवली जात आहे. यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च केला जात आहे; मात्र या योजनेची होणारी निकृष्ट कामे, त्रुटी पाहिल्यावर ही योजना नेमकी कोणासाठी ? सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावे यासाठी की लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भल्यासाठी आहे? असा प्रश्न जनतेकडून जिल्हा प्रशासनाला विचारला जात आहे.

राजापूर तालुक्यातही ११० कोटींच्या १९८ योजना मंजूर झालेल्या आहेत. यातील काही योजना पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र अनेक योजनांची कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. राजापूर तालुक्यात देवाचेगोठणे भागात या योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत; मात्र असे असतानाही अधिकारी व ठेकेदार यांनी त्याकडे दुर्लक्ष करत काम पूर्ण झाल्याचे दाखवत बिलही अदा केल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रकाप्रमाणे कामच झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जनतेच्या अनेक तक्रारी
यासह अशा तालुक्यातील अनेका योजनांच्या कामांवावत स्थानिक जनतेच्या तक्रारी आहेत. या योजनांचे ठेकेदार नेमका कोण, प्रत्यक्षात काम करतो कोण, काम पूर्ण होण्याअगोदर पूर्ण बिल काढून कसे होते असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

माजी खासदार नीलेश राणे यांचा पाठपुरावा...
राजापूर तालुक्यातील या एकूणच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे, तर या एकूणच जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांबाबत माजी खासदार नीलेश राणो यांनी दखल घेत चौकशीची मागणी करत यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरवा करण्याची ग्वाही दिल्याने आता अधिकाऱ्यांसह ठेकेदार आणि यात हात ओले करून घेणारे काही लोकप्रतिनिधी यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow