संगमेश्वर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन

Jun 29, 2024 - 12:04
Jun 29, 2024 - 14:06
 0
संगमेश्वर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन

देवरूख : संगमेश्वर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने देवरुख तहसिलदारांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले. या नंतर तहसीदार कार्यालयाच्या बाहेर येत 'ओबीसी संघर्ष समितीचा विजय असो, एकच पर्व ओबीसी सर्व, हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत ओबीसींनी कार्यालय परिसर दणाणून सोडला. 

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी कुणबी असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात हे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार जयविजय पंडीत यांच्याकडे सादर करण्यात आले. या निवेदनात सगेसोयरे अधिसूचनेला अंतिम स्वरूप देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे हे नुकतेच उपोषणाला बसले होते. या अधिसूचनेला अंतिम स्वरूप देण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे. त्यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण एक महिना स्थगित केले आहे. नेहमीप्रमाणे सरकारवर दबाव टाकून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा व मराठ्यांना ओबीसीमध्ये मागील दाराने घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य सरकारही त्यांच्या मागणीला अनुकूल प्रतिसाद देत आहे. हे दुर्देवी आहे. ओबीसींचा शासनाच्या याबाबतच्या कोणत्याही निर्णयाला विरोध राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन सादर करताना जि. प. चे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, जि. प. माजी अध्यक्ष संतोष थेराडे, ओबीसी संघर्ष समितीचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष कृष्णा हरेकर, संतोष लाड, बापू गांधी, श्रीकृष्ण जागुष्टे, दिलीप बोथले, दिलीप पेंढारी, राजेंद्र पोमेंडकर, प्रफुल्ल भुवड, पप्पू नाखरेकर, प्रवीण टक्के, अमोल लाड, विजय कुवळेकर, नितीन लोकम, जितेंद्र लाड, किर्वे मॅडम आदीसह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहदेव बेटकर, संतोष थेराडे, कृष्णा हरेकर, संतोष लाड, विजय कुवळेकर, नितीन लोकम, किर्वे मॅडम यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करताना म्हटले की, ओबीसींनी आता जागरूक होणे गरजेचे असून आपल्या न्यायहक्कासाठी सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. असे आवाहन केले. सूत्रसंचालन युयुत्सू आर्ते यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow