"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग'', विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Jun 29, 2024 - 16:59
 0
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग'', विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

मुंबई : अर्थमंत्र्यांनी कालच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन विधिमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे.

त्यानंतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. शासन निर्णय काढता येतो. परंतु ही प्रक्रिया डावलून मंत्रिमडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सरकारने शासन निर्णय काढला. हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विधानसभेत हक्कभंग झाल्याची माहिती दिल्यानंतर श्री. वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआ काढून या सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. कारण जर अर्थसंकल्पाला अजून मान्यताच नाही तरी देखील हा जीआर काढला गेला. एकमेकातील कुरघोडी आणि राजकारणापाई हा घाईगडबडीत काढलेला शासन निर्णय आहे. मा.अध्यक्ष महोदयांनी देखील हा शासन निर्णय वाचून दाखविला. त्यांनी देखील कायदेशीर बाबींची शहानिशा करणे आवश्यक होते.

या घोषणेचे श्रेय अर्थमंत्र्यांना घेवू द्यायचे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही कुरघोडी केली आहे. महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीमधील एका मंत्र्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडे वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडले आहे. राज्यात महिलावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या या सगळयाचे प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न म्हणून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली आहे.

राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता श्री. वडेट्टीवार म्हणाले, त्यांचा अभ्यास कच्चा आहे. बजेटला मंजूरी मिळाल्याशिवाय जीआर काढता येत नाही हे त्यांना कदाचित माहित नसेल.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow