SSC Exam: दहावी बोर्ड परीक्षा: काेकणात एकही काॅपीचा प्रकार नाही

May 28, 2024 - 11:46
 0
SSC Exam: दहावी बोर्ड परीक्षा: काेकणात एकही काॅपीचा प्रकार नाही

पुणे : राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत २९९ गैरप्रकारांची नाेंद झाली आहे. त्यामध्ये काॅपी केल्याप्रकरणी १४५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच डमी विद्यार्थी परीक्षेला बसविल्याप्रकरणी म्हणजेच ताेतयेगिरीच्या २ घटना घडल्या आहेत.

उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे, विनंती करणे असे प्रकार निर्दशनास आल्याप्रकरणी १५२ प्रकार असे एकूण २९९ गैरप्रकार घडल्याची माहिती अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.

काॅपी केल्याप्रकरणी सर्वाधिक ८६ प्रकरणांची नाेंद छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर झाली आहे. त्यापाठाेपाठ पुणे विभागीय मंडळात १९, नागपूर १६, लातूर १०, अमरावती ७, नाशिक ६ आणि काेकण विभागात १ काॅपीचे प्रकार घडले आहेत. मुंबई आणि काेल्हापूर विभागीय मंडळात एकाही काॅपी प्रकरणांची नाेंद झालेली नाही. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन तसेच विनंती करणे आदी १५२ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यातील सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर मंडळात ७३, नाशिक ४६, काेल्हापूर १५, मुंबई १२, लातूर ४, पुणे २ ची नाेंद करण्यात आली आहे, तर नागपूर, अमरावती आणि काेकणात एकही प्रकार घडलेला नाही.

पुणे, मुंबई मंडळात ताेतयेगिरीचे २ प्रकार

दहावी परीक्षेत पुणे आणि मुंबई विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थ्यास परीक्षेला बसवीत ताेतयेगिरी केल्याचे दाेन प्रकार घडले आहेत.

विभागीय मंडळातील काॅपीचे प्रकार

पुणे : १९

नागपूर : १६

छत्रपती संभाजीनगर : ८६

अमरावती : ७

नाशिक : ६

लातूर : १०

काेकण : १

मुंबई ०

काेल्हापूर ०

गतवर्षी ११६ प्रकरणांची नाेंद

गतवर्षी २०२३ मध्ये काॅपी केल्याप्रकरणी ११६, तर परीक्षेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना साहाय्य केल्याबाबत २ प्रकरणांची नाेंद झाली हाेती. तसेच राज्यात परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर असे एकूण ३६६ गैरप्रकार घडले हाेते.

काॅपीचे प्रकार घडणे हे यंत्रणेचे अपयश

परीक्षेत गैरप्रकार घडू नयेत यासाठी राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली हाेती. स्थानिक पातळीवरही पथके लक्ष ठेवून हाेती. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसमाेर शिक्षासूचीचे वाचन केले हाेते. मात्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत काॅपीचे प्रकार घडतात, हे यंत्रणेचेही अपयश आहे.

- शरद गाेसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow