कोल्हापूर : पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

Jul 1, 2024 - 12:22
 0
कोल्हापूर : पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर : गेली महिनाभर पावसाची उघडझाप सुरू असल्याने जून महिन्यातील सरासरीच्या ५५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. शिरोळसह चार तालुक्यांनी जूनची सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस हातकणंगले तालुक्यात १९१ मिलिमीटर झाला आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. जूनमध्ये जोरदार कोसळेल, असा अंदाज अगोदरच हवामान विभागाने वर्तविला होता. जिल्ह्याची जूनची सरासरी ३६२ मिलिमीटर आहे. त्यापैकी १९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी केवळ २५ टक्केच पाऊस झाला होता. महिन्याभरात हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी व कागल तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या.

गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात पाऊस चांगला झाला आहे. धरण क्षेत्रातही रोज पाऊस असल्याने पाणी साठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंचगंगा १७.७ फुटांवर आहे. 'राजाराम' सह सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

राधानगरी सर्वांत मागे
- 'धरणाचा तालुका' म्हणून राज्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यात गेल्या काही वर्षांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस होत आहे
- जूनची सरासरी ६६४ मिलिमीटर होती, त्यापैकी केवळ २४९ मिलिमीटर (३७ टक्के) पाऊस झाला आहे.

प्रमुख धरणातील पाण्याची टक्केवारी
कडवी ५०
कासारी ३०
दूधगंगा १६
राधानगरी ३०
तुळशी ३७
वारणा ३३


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow