दापोलीतील जोग नदीत प्लास्टिक कचऱ्याचं साम्राज्य

May 29, 2024 - 17:23
 0
दापोलीतील जोग नदीत प्लास्टिक कचऱ्याचं साम्राज्य

दापोली : दापोली शहरातून वाहणारी जोग नदी प्लास्टिकने भरली आहे. पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ झाली नाही तर पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थिती ओढवू शकते. दापोली केळस्कर नाका, आसराचा पूल जोग नदी या ठिकाणी पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती उद्भवते. त्यात नदी लगत असणारी बांधकामे, भलेमोठे होर्डिंग अशी दाटीवाटी आहे. आताच नदीत लोखंडी पाईप आणि कचरा साचला आहे. या सगळ्यात जोग नदीचा श्वास कोंडून अखेरची घटका मोजत आहे, असे चित्र पहावयास मिळत आहे. तर याच जोग नदी तीरावर एक मोठे होर्डिंग आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे होर्डिंग पडून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात दापोलीत सातत्याने वादळात नुकसानीच्या घटना घडत आहेत अशातच दापोलीत पावसाळ्यात वादळ स्थिती उदभवली तर मानवनिर्मित आपत्ती ओढवू शकते. दापोली नगर पंचायत कार्यक्षेत्रात हे जोग नदी पात्र येते. पावसाळा जवळ आला तरी या नद्या मोकळा श्वास घेवू शकत नाहीत. या बाबत लोकप्रतिनिधी यांना विचारणा केली की, फंड तरतूद नाही, तर कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कारभारात नियोजनाचा अभाव असतो असे सांगितले जाते. तर एखाद्या कामाचा प्रस्ताव केला की त्यात राजकारण आडवे येऊन ते रेंगाळते असे सांगितले जाते. मात्र या सगळ्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागतो.

या वर्षी नदीतील कचरा उचलला गेला नाही तर पावसाळ्यात हाच कचरा रस्त्यावर येईल आणि याचा त्रास दापोली तालुक्यातील नागरिकांना सहन करावा लागेल. त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सलीम रखांगे, सामाजिक कार्यकर्ते दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:50 PM 29/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow