दाभोळे घाटात उपाययोजनेची गरज; भरपावसात खोदाई

Jul 13, 2024 - 10:54
Jul 13, 2024 - 13:56
 0
दाभोळे घाटात उपाययोजनेची गरज; भरपावसात खोदाई

साडवली  : दाभोळे घाटात सकाळी एसटी बसचा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून बस दरीत जाता जाता वाचली. या अपघातात डंपरने हूल दिल्याने चिखलावरून घसरून या गाडीने दरीकडील बाजूस मार्ग बदलला. मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामासाठी दाभोळे घाट फोडण्यात येत आहे; मात्र पावसाळ्यापूर्वी रस्ता योग्यरित्या सुरू राहण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात त्याकडे महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

या घाटात नवीन एका बाजूची मार्गिकासुद्धा तयार झालेली नाही. संथगतीने झालेल्या कामामुळे या ठिकाणी डोंगरावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साठत आहे त्याचबरोबर डोंगरातील चिखलमिश्रित माती रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होत आहे. यामुळे मागील महिन्यापासून घाटात लहान-मोठे अपघात घडले आहेत. ठेकेदार कंपनी हात झटकत असून योग्य ती खबरदारी घेत नाही, असे दिसून येत आहे. पोलिस यंत्रणादेखील घटना घडल्यानंतर पंचनामे करत आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणजे आंबाघाट. हा देखील रूंदीकरणासाठी खोदण्यात आला आहे. या ठिकाणी मुर्शी व दख्खन गावामध्ये भरपावसात सुरूंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. यावर कोणाचाही अंकुश नाही. हा घाट दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो.

त्यामुळे सुरूंगामुळे भूगर्भात हालचाली झाल्या तर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळू शकतात. २०२२ मध्ये झालेल्या पावसात या घाटात १५ हून अधिक ठिकाणी दरडी कोसळून हा घाट २ महिन्यापेक्षा जास्त काळ वाहतुकीस बंद होता. त्याचबरोबर दख्खन, मुर्शी, ओझरे या गावात घरावर दरडी कोसळून नुकसान झाले होते. त्यामुळे या सर्व बाबींकडे गांभीयनि पाहणे महत्त्वाचे आहे अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow