Gold Price : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ, अर्थसंकल्पानंतर दरात घसरण होणार का?

Jul 13, 2024 - 13:58
 0
Gold Price : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ, अर्थसंकल्पानंतर दरात घसरण होणार का?

मुबई : सोन्याच्या दरात (Gold Price) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. दरम्यान, या वाढत्या दरामुळं सोन्यावरील शुल्क कमी करण्याची देखील मागणी होत आहे.

त्यामुळं अर्थसंकल्पानंतर (Budget) सोन्याच्या दरात घसरण होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

वाढत्या सोन्याच्या दरामुळं लोक सोन्याच्या खरेदीकडं पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दर वाढल्यामुळं लोक सोने खरेदीचा निर्णय पुढे ढकलत आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पामुळं सोन्याचे भाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुमारे 2 टक्क्यांनी महागले आहे. तर देशांतर्गत बाजारात शुक्रवारी, MCX वर सोन्याचा दर हा 73,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

चालू वर्षात सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची वाढ

या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 63,870 रुपये होता, तो आता 73 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. याचाच अर्थ या वर्षासाठी सोने आता सुमारे 15 टक्क्यांनी महागले आहे. त्याचा थेट परिणाम मागणीवर दिसून येत आहे. एप्रिल ते जून तिमाहीत देशातील सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 15 टक्क्यांनी घसरली आहे. वाढत्या किमतीमुळं लोक सोने खरेदीपासून दूर राहत आहेत. दुसरीकडे, लग्नासाठी शुभ मुहूर्त कमी असल्याने जुलैमध्ये सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढलेली नाही.

सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन 10 टक्के करावं

बाजारात सोन्याची मागणी घसरल्यानं ज्वेलरी उद्योग नाराज आहे. सरकारनं अर्थसंकल्पात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन 10 टक्के करावे, अशी दागिने उद्योगाची मागणी आहे. त्याचवेळी, उद्योगातील काही लोक शुल्क कमी करून 4 टक्के करण्याची मागणी करत आहेत.

मागणी पूर्ण झाल्यास सोने स्वस्त

सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यास सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. कस्टम ड्युटी कमी केल्यानं त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीवर होईल आणि सोने खरेदी स्वस्त होईल. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पानंतर लोकांना सोने खरेदीची सुवर्णसंधी मिळू शकते. येत्या 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow