गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन साजरा

Jul 15, 2024 - 14:49
 0
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन साजरा

रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्याने कीर्तन सादर करून कालिदास दिन साजरा करण्यात आला.

दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला कालिदास दिनाच्या निमित्ताने कालिदास आणि कालिदासाचे साहित्य यांची आठवण करून त्याचा जागर केला जातो.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही दरवर्षी कालिदास दिन कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने यावर्षी महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयातून संस्कृत विषयात एम्. ए. पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करतात. यावर्षी एका अभिनव कल्पनेतून कालिदास दिन साजरा करण्यात आला. एमए (संस्कृत) पदवी प्राप्त केलेला आणि कीर्तनशास्त्राचा अभ्यास करणारा विद्यार्थी मयूरेश जायदे याने कीर्तनाच्या माध्यमातून कालिदास या आख्यानविषयातून विचार व्यक्त केले. यातून एका शैक्षणिक कीर्तनाचा पहिल्यांदा अनुभव घेत उपस्थितांना मयूरेशने उत्तम रसानुभूती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. त्यांनी कालिदास दिनाची परंपरा सांगून या वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर सर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संस्कृतचा आणि कालिदासाच्या साहित्याचा विशेष अभ्यास करावा.

मुख्य कार्यक्रमात मयूरेशने कीर्तनातून कालिदासाची कथा सांगितली. यावेळी त्याला गुरुराज ठाकुरदेसाई याने संवादिनी तर ईशान खानोलकर याने तबलासाथ केली. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयात नव्याने प्राध्यापक म्हणून संस्कृत विभागात रुजू झालेल्या सौ. प्रज्ञा सचिन भट यांचे प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी श्रेया आठल्ये हिने सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमासाठी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, महाविद्यालयाचे परीक्षा विभाग नियंत्रक डॉ. विवेक भिडे, विविध विभागप्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्कृत शिक्षक, पालक आणि संस्कृतचे आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow