पवित्र पोर्टल रत्नागिरीसाठी अपवित्र : सुरेश भायजे

Jul 17, 2024 - 12:07
Jul 17, 2024 - 12:35
 0
पवित्र पोर्टल रत्नागिरीसाठी अपवित्र : सुरेश भायजे

संगमेश्वर : पवित्र पोर्टल शिक्षक भरतीतून पहिल्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षक भरती झाली. त्यात स्थानिक फक्त सहा शिक्षकांचा समावेश आहे. आता पवित्र पोर्टल शिक्षक भरतीद्वारे दुसऱ्या यादीत ३४८ शिक्षक भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक एकही शिक्षक नाही, हा प्रकार संतापजनक व चीड आणणारा असून, रत्नागिरीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आहे. भ्रष्टाचाराच्या वणव्याचा आगडोंब झाला असून, त्यात जिल्ह्यातील स्थानिक डीएड, बीएड् व पदवीधर बेरोजगार निरपराध मुलांचा बळी घेतला जात आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला असून, हे पोर्टल जिल्ह्यासाठी अपवित्र ठरत आहे, अशी पुस्ती जोडली.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती नवरत्नांची खाण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी अपवित्र झाली आहे, असे मत व्यक्त करून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भायजे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७ हजार ७९ एवढी शिक्षक पदे आहेत त्यात ५ हजार ९५५ भरती झालेले व कार्यरत शिक्षक असून, ११२४ शिक्षक भरणे अजूनही बाकी आहे. शासनस्तरावर जे निवृत्त झालेले शिक्षक आहेत त्यांना ६० ते ७० वर्षे अशी दहा वर्षे वीस हजार रुपये दरमहा मानधनावर भरती करण्याचे प्रस्तावित आहे. हे वयोवृद्ध सेवानिवृत्त पेन्शनधारक शिक्षक खरोखर मुलांना शिकवू शकतील का? जिल्हा प्रचंड सुशिक्षित बेरोजगार असताना हा शासनाचा खटाटोप कशासाठी? रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक ज्या पदवीधर ६५० मुलांनी केवळ ९ हजार रु. मानधनावर ११ महिने कंत्राटी पद्धतीने काम केले आहे त्यांनाच शिक्षक भरतीत समावेश करावा, असे आवाहन भायजे यांनी केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow