रत्नागिरी : जिल्ह्यात पावसामुळे साडेसहा लाखांचे नुकसान

Jul 18, 2024 - 11:38
Jul 18, 2024 - 11:46
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसामुळे साडेसहा लाखांचे नुकसान

रत्नागिरी : सोमवारनंतर मंगळवारी पावसाची जोर ओसरला असला तरी काही भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांत मंगळवारी जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावासामुळे काही भागात पक्क्या घरासह अंशतः घरांची पडझड आणि अन्य वित्तहानीमध्ये सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात किरकोळ पाऊस हानी झाली; मात्र दापोली तालुक्यात पावसामुळे हानी झाली. तालुक्यातील सातांबा गावातील सुभाष पांडुरंग साळवी यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ६५ हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. लोणवडी येथील वासंती शंकर रहाटवळ यांची घराच्या भिंतीची पडझड होऊन नुकसान झाले. आतगांव येथील संजय कृष्णा गावडे यांच्या गोठ्याचे अंशतः नुकसान झाले. तालुक्यातील पिसई गावातील चिंतामणी बाग येथे रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्याने वाहतूक बाधित झाली होती. साडवली येथील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरीची संरक्षण भिंत कोसळून २० हजारांचे नुकसान झाले.

नरेंद्र कदम यांच्या विहिरीची संरक्षण भिंत कोसळून ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. उंबर्ले येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीची संरक्षण भिंत कोसळून वीस हजारांचे नुकसान झाले. महाळुंगे येथील मनोहर दाजी होळकर यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान तीस हजार, पुंडलिक कृष्णा होळकर यांच्या घराचे दहा हजार, लक्ष्मी रेमजे यांच्या घराचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. महाळुंगे येथील यशवंत रामा होळकर यांच्या गोठ्याची एक लाख ७० हजार रुपयांची हानी झाली.

चिपळूण शहरातही जोरदार पावसाचा फटका बसला. शहरातील मतेवाडीतील रस्त्यालगत असलेले नारळाचे झाड वीज खांबावर जाऊन अडकल्याने येथील बीजपुरवठा खंडित झाला. गुहागर तालुक्यात नाईक कंपनीजवळील दोन विद्युत रोहित्रे तसेच भाजी मंडईमागील एक विद्युत रोहित्र सुरक्षिततेसाठी बंद करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे या भागात वीजप्रवाह खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

अतिवृष्टीमुळे वडेरू येथील श्रीपत कदम यांच्या घरालगत असणाऱ्या शेतीच्या बांधाचे अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. विजय जाधव यांच्या गोठ्याचेही अंशतः अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. परचुरी येथील सुरेश आंबवकर घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून १५ हजारांची हानी झाली.

संगमेश्वर तालुक्यात माखजन बाजारपेठेतील १० दुकानांमध्ये पाणी गेल्याने दुकानातील साहित्याची आणि सामानाची हानी झाली. पुर्ये तर्फे देवळे शिंदेवाडी येथील सीताराम मोरे यांच्या घराची अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून अंदाजे २५ हजारांचे नुकसान झाले. धामापूर तर्फे संगमेश्वर भडवलीवाडी येथील स्मशानभूमी शेडवर झाड पडून सात हजारांची हानी झाली. राजापूर तालुक्यात धोपेश्वर येथील धोंडू कोकर यांच्या राहत्या घराची कौले वादळी वाऱ्याने उडाली. जैतापूर बाजारवाडी येथे कमरुदद्दीन सय्यद यांचे घरावर आणि माडबन अंगणवाडीवर माडाचे झाड पडल्याने घराची अंशतः हानी झाली. सुशांत राऊत घराच्या पडवीचे छप्पर पडून आणि वैजयंती गवाणकर यांच्या घराच्या पडवीवर माडाचे झाड पडल्याने हानी झाली. माडबन येथील साखरवठा येथील बापू साखरकर यांच्या घरावर झाड पडून अंशतः नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow