छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार नटसम्राट आहेत : संजय राऊत

Jul 18, 2024 - 11:42
 0
छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार नटसम्राट आहेत : संजय राऊत

मुंबई : बारामतीत झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवरून संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटातही काम केलेले आहे. खूप वेळा आपले रंगरूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे. पण शरद पवार हे सर्वांत मोठे नटसम्राट आहेत, त्यांना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात एक खुले रंगमंच आहे ते फिरत राहतात, छगन भुजबळ यांसारखे जे नेते आहेत ते फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी टोलेबाजी केली.

आमचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही

आमचा कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही. ही चुकीची माहिती आहे की, आम्ही २८८ जागांचा विचार करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसही २८८ जागांवर चाचपणी करत आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा २८८ जागांचा अभ्यास करत आहे. हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावर तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू. कोणी कुठे किती जागा लढवायच्या आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल असे आमचे सूत्र आहे, हे सूत्र लोकसभेलाही होते, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना ६ हजार, पदवीधरांना १० हजार, खरी गरज लाडक्या बहिणींना आहे अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण किंवा सून त्यांचे घर पंधराशे रुपयात चालू शकते का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow