रत्नागिरी : विजेच्या खेळखंडोबाने हातीस, तोणदे, टेंबेपूल येथील ग्रामस्थ त्रस्त

Jul 23, 2024 - 11:45
Jul 23, 2024 - 12:47
 0
रत्नागिरी : विजेच्या खेळखंडोबाने हातीस, तोणदे, टेंबेपूल येथील ग्रामस्थ  त्रस्त

रत्नागिरी : तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्टयातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव न थांबल्यास चार ते पाच गावांतील नागरिकांनी महावितरणवर धडक देण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून काजळी नदीच्या किनाऱ्यावरील तोणदे, हातीस, टेंबेपूल व परिसरातील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांकडून महावितरणकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या भागांना पूर्वी कुवारबाव येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत होता. मात्र त्यानंतर तो पानवल येथील नव्या उपकेंद्रातून सुरु करण्यात आला. त्यानंतर डोंगरी भागातील या गावांमध्ये सातत्याने विजेचा लपंडाव सुरु झाला आहे.

वीज वेळीअवेळी जात असल्याने नळपाणी योजनांवर त्याचा परिणाम होत असून, पिण्याचे पाणीही नियमित येत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. पानवलकडून येणारी ही वाहिनी डोंगरातून झाडीझुडपातून आणि नदी किनाऱ्यावरुन टाकण्यात आली असल्याने, रात्री अपरात्री वीज गेल्यावर दोष शोधून काढणेही लाईनमनना कठीण बनले आहे. त्यामुळे या ट्रान्स्फॉर्मरपर्यंत आलेली वीजवाहिनी ही भूमिगत करून द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

महावितरणचा कारभार सुधारला नाही, तर पंधरा दिवसांत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे वीज बिले भरण्वावरही बहिष्कार टाकण्यात येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातही वीज पुरवठ्यात व्यत्यय
रत्नागिरी शहरातील खालच्या भागामध्येही गेल्या काही दिवसांपासून विजेच्या लपंडावाचा फटका बसत आहे. झाडगाव येथील उपकेंद्रात वारंवार तक्रार करूनही त्यात सुधारणा झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow